लखनौ : उत्तरप्रदेशमधील कैराना लोकसभा मतदारसंघात मतदाना दरम्यान गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना कैराना लोकसभा क्षेत्रातील शामली येथे गुरुवारी (4 एप्रिल) घडली. पहिल्या टप्प्यातील मतदाना दरम्यान शामली मतदान केंद्रावर काही अज्ञात लोक मतदान ओळखपत्राशिवाय मतदान करण्यातकरीता आले होते. यावेळी त्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नसल्याने त्यांना मतदान करु दिले नाही. त्यामुळे या अज्ञातांनी मतदान केंद्राबाहेर गोळीबार केला. यानंतर त्यांना पळवण्यासाठी बीएसएफ जवानांनीही हवेत गोळीबार केला.
जिल्हाधिकारी म्हणाले, “काही अज्ञात लोक मतदान ओळखपत्राशिवाय मतदान करण्यासाठी आले होते. मतदान ओळखपत्र नसल्याने त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला नाही. तसेच मतदानही करु न दिल्याने त्यांनी गोळीबार केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बीएसएफ जवानांनी हवेत गोळीबार केला. सध्या इथे मतदान सुरुळीत सुरु आहे”. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये स्पष्टपणे बीएसएफ जवान गोळीबार करताना दिसत आहे.
#WATCH Security personnel fired shots in air after some ppl tried to cast vote without voter ID at a polling station in Shamli. District Magistrate says,“BSF personnel, fired in air for security reasons after some ppl without voter ID tried to cast vote. Voting has resumed now.” pic.twitter.com/iXRkS6xFaD
— ANI UP (@ANINewsUP) April 11, 2019
कैराना मतदारसंघात 5 लाख मुस्लीम मतदार आहेत. तर 4 लाख मागासवर्गीय (जाट, गुर्जर, सैनी, कश्यप, प्रजापती आणि इतर) मतदार आहेत. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून गंगोहचे आमदार प्रदीप चौधरी निवडणूक रिंगणात आहेत. सपा-बसपा आघाडीकडून तबस्सुम बेगम आणि काँग्रेसकडून हरेन्द्र मलिक निवडणूक रिंगणात आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हुकुम सिंह यांनी कैराना लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सपाच्या पाठिंब्याने आरएलडी पक्षाच्या तबस्सुम बेगम यांनी या मतदार संघात विजय मिळवला होता.
आरएलडीच्या तिकिटावर तबस्सुम हसनने भाजपच्या मृगांका सिंह यांचा 44618 मतांनी पराभव केला होता. आता भाजपने प्रदीप चौधरी यांना कैराना मतदारसंघातून निवडणुकीचे तिकिट दिलं आहे. प्रदीप चौधरी नकुड आणि गंगोहमधून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.