मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या (24 फेब्रुवारी) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जाहीर करणार असल्याची घोषणा केली (First list of loan waiver Farmer). यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हेही उपस्थित होते. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या शेतकऱ्यांचं पीककर्ज 2 लाख रुपयांपर्यंतचं आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा आम्ही नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती. त्याची सुरुवात आम्ही उद्या करणार असून उद्या कर्जमुक्त शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर होईल. अर्थातच ही पहिली यादी आहे, अंतिम यादी नाही. कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना लाभ मिळाल्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने यादी जाहीर करु.
LIVE TV: 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, उद्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/er76ysKpnL pic.twitter.com/QCBdvadmE9
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 23, 2020
कर्जमुक्तीच्या योजनेची घोषणा केली तेव्हाच आम्ही मार्च, एप्रिल आणि मे अशा तीन महिन्यात याची अंमलबजावणी करु, असं आश्वासन दिलं होतं. फडणवीस सरकारच्या काळात ज्यामध्ये आम्हीही होते, त्यांच्यावेळची कर्जमाफीची योजना अजून चालू होती. ही योजना किती काळ सुरु राहणार? या योजनेला काही कालमर्यादा नव्हती. त्यांनी घोषणा केल्यावर 7 महिन्यांनी लोकांना मदत होण्यास सुरुवात झाली. ती अजून सुरु होती. म्हणून आम्ही आमच्या योजनेला कालमर्यादा ठेवली. पहिल्या यादीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गावांच्या 20 हजार शेतकऱ्यांच्या नावाची घोषणा होईल. दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर होईल. येत्या तीन महिन्याच्या कालावधीत ही योजना पूर्ण होईल. एप्रिलच्या अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल, असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
आत्तापर्यंत सरकारकडे 35 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती आली आहे. त्यावर काम सुरु झालं आहे. टप्प्याटप्प्याने ही यादी जाहीर केली जाईल. यात पूर्ण पारदर्शकता असेल. पहिल्या सरकारच्या काळात आम्ही लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, ती यादीच जाहीर झाली नाही. म्हणून आम्ही प्रथम याद्या तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
First list of loan waiver Farmer