भाजप प्रवेशावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Sep 02, 2019 | 3:52 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भासले (Udayanraje Bhosale) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे. मात्र, आतापर्यंत त्यांनी यावर थेट भाष्य करणं टाळलं होतं. अखेर सोमवारी (2 सप्टेंबर) त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजप प्रवेशावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भासले (Udayanraje Bhosale) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे. मात्र, आतापर्यंत त्यांनी यावर थेट भाष्य करणं टाळलं होतं. अखेर सोमवारी (2 सप्टेंबर) त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंची (Udayanraje Bhosale) मनधरणी करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) पाठवले आहे.

उदनराजे भोसले म्हणाले, “मी माझ्या अटींवर प्रवेश करेन. मी काय करावं हे कुणी दुसरं सांगू शकत नाही. मला काय करायचं ते मी ठरवणार आहे. मला शोभेल असं आणि लोकहिताच्या अटी मान्य झाल्यास मी निर्णय घेईन. शेतकऱ्यांसाठी विमा योजनेची अट आहे. मी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. त्यांनी ठरवावं आणि मला सांगावं. जायचं असेल तर हो, नसेल तर नाही.”

उद्योग बंद पडत आहेत. त्यांना पुन्हा कसं सुरू करता येईल, यावर विचार करावा लागेल. अन्यथा भारतावर दिवाळखोरीची वेळ येईल. आपण पैसे कोठून आणणार? आपण पैशाचं नाटक करू शकत नाही, असंही उदयनराजे यांनी सांगितलं.

‘नोटबंदी, जीएसटीवर आजही माझी नाराजी’

नोटबंदी आणि जीएसटीवर त्यांच्या भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी आपण आजही नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर नाराजच असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “नोटाबंदीनं ग्रामीण भागातील गरिबांच्या आयुष्याची कमाई उद्ध्वस्त केली. आपल्या देशातील नागरिकांची स्थिती लक्षात घ्यायला हवी. देशातील निम्म्याहून अधिक लोकांना बँकिंग क्षेत्राविषयी फारशी माहिती नाही. शहरात काहीशी वेगळी स्थिती मात्र, काही ठिकाणी घरात टीव्ही देखील नाही. त्यांना काय कळणार? त्यामुळे नोटा बंद करताना थोडा तरी विचार करायला हवा होता.”

‘रेरा कायद्याने बांधकाम क्षेत्र ठप्प’

उदयनराजेंनी यावेळी रेरा काद्यावर आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “नोटबंदी आणि जीएसटीसोबतच रेरा कायदा देखील लागू करण्यात आला. त्यामुळे बांधकाम क्षेत्र ठप्प झालं आहे. या क्षेत्रातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारला हे निर्णय मागे घ्यावे लागतील किंवा त्यात काही मोठे बदल करावे लागतील. त्याशिवाय सरकारपुढे पर्याय नाही.”

माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं आहे. फडणवीस मुख्यमंत्री नव्हते आणि आमदारही नव्हते तेव्हापासून माझे मित्र आहेत. मी त्यांना व्यवस्थित विचार करायला सांगितले आहे. आपण सुशिक्षित आहोत. मात्र, आपण जर निरक्षरांच्या जागेवर असतो, तर आपण सत्तेवर असलेल्यांकडून काय अपेक्षा केल्या असत्या, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यांच्यावर जर उपासमार करण्याची वेळ आली तर चोरीच्या घटना वाढतील. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल. म्हणून यावर तोडगा काढला पाहिजे, असंही उदयनराजे भोसले यांनी यावेळी नमूद केलं.