मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार घडामोडी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. या सर्व घडामोडीत आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजून 164 तर प्रस्तावाच्या विरोधात 106 इतके मतदान झाले. त्यामुळे भाजपाचे (BJP) उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)हे विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. दरम्यान मतदानासाठी शिवसेनेकडून आपल्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. मात्र हा व्हीप डावलून बंडखोर आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे शिवसेनेच्या प्रतोदकडून व्हीप मोडल्याप्रकरणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांना पत्र देण्यात आले. त्याची दखल झिरवळ यांच्याकडून घेण्यात आली. मात्र त्यानंतर लगेचच बंडखोर आमदारांचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले. या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या 16 आमदारांनी आमचा व्हीप मोडत विरोधी पक्षाला मतदान केल्याचे म्हटले आहे. याची दखल विधानसभा अध्यक्षांकडून घेण्यात आली.
बंडखोर आमदारांनी आज विधानसभा अध्यक्ष निवणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले. व्हीप मोडल्याप्रकरणी शिवसेनेच्या प्रतोदकडून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र देण्यात आले. या पत्रात बंडखोरांनी व्हीप मोडल्याचे म्हटले होते. याची दखल झिरवळ यांनी घेतली. शिंदे गटातील आमदारांकडून भाजपाच्या उमेदवाराला मतदान झाले. शिंदे गटाने व्हीपचे पालन केले नाही. याची दखल मी घेतली आहे. ज्या सदस्यांनी व्हीपविरोधात मतदान केले, त्यांची नावे लिहून घेण्यात यावीत असे झिरवळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान त्यानंतर बंडखोर गटाचे प्रतोद असलेले भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले. त्यात शिवसेनेमध्ये उरलेल्या 16 आमदारांनी आमचा व्हीप मोडला आणि विरोधात मतदान केले असा आरोप करण्यात आला. याची दखल नार्वेकर यांनी घेतली आहे. भरत गोगावले यांचे पत्र मला मिळाले आहे. 16 सदस्यांनी आमच्या व्हीपच्या विरोधात मतदान केले आहे, त्याची दखल घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याची नोंद घेण्यात आल्याचे नार्वेकर यांनी म्हटले.