नवी दिल्ली : देशावर सर्वाधिक काळ राज्य केलेल्या काँग्रेसचे या निवडणुकीत पहिल्यांदाच मुख्य प्रतिस्पर्धी भाजपपेक्षा कमी उमेदवार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये भाजपने पक्षाच्या स्थापनेनंतर सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने सर्वात खराब कामगिरी करत फक्त 44 जागा जिंकल्या होत्या. एकेकाळी फक्त दोन खासदार असलेल्या भाजपचा विस्तार किती झालाय, हे यावर्षीच्या उमेदवारांची यादी पाहिल्यावर लक्षात येईल. तर दुसरीकडे काँग्रेसने मित्रपक्षांसोबत आघाडी केल्यामुळे पहिल्यांदाच भाजपपेक्षा कमी जागांवर लढण्याची वेळ आली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसने 423 उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत, तर भाजपचे 437 उमेदवार आहेत. उत्तर प्रदेशात आणखी काही जागांवर काँग्रेस उमेदवार उतरवणार आहे, पण तरीही हा आकडा भाजपच्या पुढे जाणार नसल्याचं बोललं जातंय. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा ऐतिहासिक प्रसंग आहे. कारण, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला कायम राष्ट्रीय पक्ष म्हणून पाहिलं गेलं, तर भाजपची छाप काँग्रेसच्या तुलनेत कायम कमी होती.
भाजपने अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात 1998 आणि 1999 मध्ये केंद्रात सत्ता मिळवली होती. पण 2014 चा विजय भाजपसाठी ऐतिहासिक होता. कारण, भाजपने पहिल्यांदाच स्वबळावर 282 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 44 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एकूण जागांच्या 10 टक्केही जागा जिंकता न आल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जाही मिळाला नव्हता.
एनडीए आणि यूपीएतील मित्रपक्षांमुळे जागांचं विभाजन झालं आहे. त्यामुळे काँग्रेसला पहिल्यांदाच कमी जागांवर लढत मित्रपक्षांसाठी जास्त जागा सोडाव्या लागल्या आहेत. भाजपने काँग्रेसच्या तुलनेत जास्त जागांवर लढणं या गोष्टीचा संकेत आहे, की भाजपला यशस्वीपणे मित्रपक्षांना सोबत घेता आलेलं नाही, असा तर्क काँग्रेसने दिलाय. तर काँग्रेसने नवीन पक्ष सोबत जोडल्याचं काँग्रेसने म्हटलंय.
काँग्रेसने 2014 मध्ये 44 जागांवर विजय मिळवला असला तरी भाजपपेक्षा जास्त उमेदवार दिले होते. 2014 ला काँग्रेसने 464 उमेदवार दिले होते. तर भाजपने 428 उमेदवार उतरवले, ज्यापैकी 282 उमेदवार निवडून आले. 2009 मध्ये भाजपने 433 आणि काँग्रेसने 440 जागांवर निवडणूक लढवली होती.