मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे संसदीय नेते आणि खासदार संजय राऊत पहिल्यांदाच मंत्रालयात दाखल झाले आहेत (First Visit of Sanjay Raut to Ministry). संजय राऊत मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकी कशावर चर्चा होणार याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.
संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोकसत्ता वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमालाही जाणार आहेत. त्यापूर्वी मंत्रालयात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट चर्चेचा विषय ठरत आहे. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे संजय राऊत नरिमन पॉईंट येथील एक्सप्रेस टॉवरमध्ये देखील जवळपास 35 वर्षांनी जाणार आहेत.
संजय राऊत यांच्या पत्रकारितेची सुरुवात इंडियन एक्सप्रेस समुहाच्या “लोकप्रभा” साप्ताहिकातूनच झाली होती. लोकप्रभात असताना संजय राऊत यांनी केलेली शोधपत्रकारिता महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. संजय राऊत यांनी नेहमीच आपल्याला मंत्रालय, विधानभवनात जाण्यात रस नसल्याचं म्हटलं आहे. त्यापार्श्वभूमीवर आजचा त्यांचा मंत्रालय भेटीचा योग महत्त्वाचा मानला जात आहे.
यापूर्वी 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळातही संजय राऊत केवळ दोन वेळा मंत्रालयात गेले होते. त्यांना पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यासोबत मंत्रालयात नेले होते. आता महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर संजय राऊत यांची ही पहिलीच मंत्रालय भेट आहे.
व्हिडीओ: