मुंबई : एक मार्ज रोजी सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली. एकूण दहा दिवस चाललेल्या या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. अधिवेशनाची सुरुवात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने झाली, तर शेवट मनसुख रिहेन यांचे मृत्यू प्रकरण आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे या मुद्द्यांनी झाला. या एकूण दहा दिवसांत विरोधकांनी सरकारला अनेक मुद्द्यांवरुन धारेवर धरलं. तर सरकारनेही विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची सडेतोडपणे उत्तरं देत विरोधकांच्या हल्ल्याला तेवढ्याच ताकदीने परतून लावलं. एकूण दहा दिवसांच्या या अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा आणि फडणवीसांच्या आक्रमकतेला परतवून लावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देलेली उत्तरं यांची विशेष चर्चा झाली. (five questions and answers and statements of Devendra Fadnavis and Uddhav Thackeray)
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आजच्या दिवसात वादळी घडामोडी घडणार हे अपेक्षितच होते. उद्योजक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि या मृत्यूमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा हात असल्याच्या आरोप करत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच घेरले. तर अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांच्या आरोपांना सपशेलपणे धुडकावून लावले. त्यांनतर पुन्हा पत्रकारांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी दिलेल्या स्पष्टीकरणाची फडणवीस यांनी त्यांच्या शैलीत खिल्ली उडवली.
1) उद्योजक मनुसख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूनंतर राज्यात खळबळ उडाली. हिरेन यांच्या मृत्यूमागे सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केला. त्यांच्या या आरोपांवर ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. “सचीन वाझे पूर्वी शिवसेनेत होते. त्यांनी सदस्यत्व पुन्हा घेतलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही. सर्व विषयात निष्पक्षपणे पाहायचा चष्मा लावा. प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा आहे. त्यांची तपास यंत्रणा भारी असेल तर पोलीस यंत्रणा रद्द करुन टाकायची का?,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
2 ) तसेच पुढे बोलताना, “मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, असं सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी?. एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून सचिन वाझेंना लटकवताय का?” असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला.
3) नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवताना ठाकरे यांनी जनतेला बांधील असल्याचं म्हटलं. या विषयावर बोलताना “आम्ही मतं बदलत नसतो, एखाद्या उद्योगाला किंवा रिफायनरीला आम्हाला वाटतं म्हणून आम्ही विरोधी किंवा पाठिंबा देत नसतो. राज्याचा हिताचा तो आहे, परंतु जिथे तो होणार होता, तिथल्या स्थानिक जनतेचा त्याला विरोध आहे. जमीन खरेदी केलेली काही लोक माझ्याकडे आली होती, त्यांना मी सांगितलं तुमच्यासाठी निर्णय बदलणार नाही. आम्ही बांधिल आमच्या जनतेला आहोत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
4) तसेच पुढे बोलताना, अर्थसंकपीय अधिवेशन चांगल्या प्रकारे पार पडल्याचे ते म्हणाले. “महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपन्न झालं. कोरोनाच्या काळात हे आव्हानात्मक होतं. 10 दिवसांमध्ये काय झालं याचे आपण साक्षीदार आहोत. मी विरोधीपक्षांसह सर्वांना धन्यवाद देतो. महाराष्ट्र थाबंला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही,या सूत्रानुसार अर्थसंकल्प मांडला गेला,” असं ठाकरे म्हणाले.
5) यावेळी बोलताना सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या खासदार मोहन डेलकर, उद्योजक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर भाष्य केले. “मृत्यू झाल्यानंतर दखल घेणं सरकारचं काम आहे. हिरेन प्रकरणाप्रमाणं मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचं प्रकरण आहे. त्यामध्ये नावं आहेत. तपास सुरु आहे जिलेटीन कांड्या प्रकरणी तपास सुरु आहे. फाशी द्या आणि तपास करा ही पद्धत होऊ शकत नाही. कोणताही मृत्यू असो, मग तो हिरेन यांचा मृत्यू असो किंवा डेलकर यांचा मृत्यू कोणत्याही तपासात कोणी सापडेल त्याला दया-माया दाखवली जाणार नाही,” अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
1) सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांविषयी बोलताना सरकारकडून वाझे यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याचा आधार घेत, “सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, सचिन वाझेंकरिता अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत. त्यांना दुसरा वकील नेमण्याची आवश्यकता नाही,” असा सणसणीत टोला फडणवीस यांनी लगावला.
2) मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वाझे हे काय ओसामा बिन लादेन आहेत का?, असे म्हणत निष्पक्षपणे चौकशी होईल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ठाकरेंच्या या वक्तव्याचा फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. “सचिन वाझेंना आता वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत. वाझेंकडे असे काय पुरावे आहेत की ज्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही? असा सवाल करतानाच वाझे हे ओसामा नाहीत हे आम्हालाही माहीत आहे. पण मुख्यमंत्री मात्र तुघलकी निर्णय घेत आहेत,” असे फडणवीस म्हणाले.
3) मनसुख हिरेन, सचिन वाझे तसेच नाणार प्रकल्पावर बोलताना हे सरकार जनतेला बांधिल असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर पत्राकारांशी बोलताना हे सरकार लबाड असल्याचे फडणवीस म्हणाले. “हे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार आहे. ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलं जाईल,” असा टोला फडणवीसांनी लगावला.
4) अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर महाराष्ट्र कधी थांबवणार नाही. हे अधिवेशन चांगल्या प्रकारे पार पडले, असे ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर अधिवेशनाच्या कामकाजावर बोलताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना नामोहरम केल्याचं फडणवीसांनी म्हटलं. ” या अधिवेशनात सत्तारुढ पक्ष उघडा पडला. वरच्या सभागृहात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खालच्या सभागृहात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि भाजपच्या टीमने या सरकारला उघडं पाडलं,” असे म्हणत सरकारवर टीका केली.
5) राज्यात ज्या काही गोष्टी घडतील त्यावर निष्पक्षपणे चौकशी केली जाईल. कोणालाही पाठीमागे घातले जाणार नाही, असे उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलतना म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना, “खासदार मोहन डेलकर असो की पूजा चव्हाण, किंवा मग सचिन वाझे, सर्व प्रकरणात सखोल चौकशी झालीच पाहिजे. मनसुख हिरेन यांची पत्नी म्हणते सचिन वाझेंनी माझ्या पतीचा खून केला. डेलकरांचे कुटुंब मुख्यमंत्र्यांना प्रिय आहे. हिरेन कुटुंब कमी असं म्हणायचं का?,” असा सवाल फडणवीसांनी ठाकरे यांना केला.
इतर बातम्या :