औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), पत्नी संजना जाधव (Sanjana Jadhav) यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. 2003 मध्ये चूक केली आणि भोगत आलो, असं म्हणत आपल्या लग्नाविषयी त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केलं. शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला, हे बेणं म्हणजे 2029 चा आमदारच म्हणा ना, अशा शब्दात पुत्र आदित्य जाधव (Aditya Jadhav) यांचंही तोंडभर कौतुक केलं. (former MLA Harshavardhan Jadhav praises son Aditya Jadhav who fought against Raosaheb Danve)
शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड मतदारसंघात आयोजित सभेत आपली आगामी रणनीती जाहीर केली. “बाप जेलमध्ये घातला, तर पोरगा उठून उभा राहिला. त्यांना वाटलं याला घातला आतमध्ये, तर सरेल, इकडे मारुन घेऊ पूर्ण मतदारसंघ. पण मध्येच शिवबाची तलवार चमकली, कापला. शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला. बेणं पक्कं आहे, कच्चा नाही, 2029 चा आमदारच म्हणा ना” असं म्हणत हर्षवर्धन जाधवांनी मुलगा आदित्य जाधवचं कौतुक केलं.
“अगदी हत्येचा प्रयत्न झाला, तरीही…”
“मतदारसंघासाठी जाधव कुटुंब अविरत झटत राहणार. मधल्या काळात अत्यंत वाईट दिवस आले. लोक म्हणाले दादा तुम्हाला म्हातारपणात वेगळं सुचायला लागलं. मग पत्ते उघड झाल्यावर म्हणाले, तुमचं बरोबर होतं. हे नेहमीचं आहे. शिवणा टाकळीच्या आंदोलनातही धरणात गाडी ढकलली, तेव्हा लोक म्हणाले. बाप शांततेच्या मार्गाने लढला, पोरगा इतका डांबरट. पण मग काय झालं… हर्षवर्धन जाधव आमदार झाला.. मी तुमच्याशी, मतदारसंघाशी गद्दारी करणार नाही. कितीही संकटं आली, उलथापालथ झाली, अगदी हत्येचा प्रयत्न झाला, तरीही” अशी ग्वाही हर्षवर्धन जाधवांनी दिली.
“तुम्हाला ठोकला नाही, तर नावाचा हर्षवर्धन नाही”
“इथे आई आहे, इशा (मैत्रीण इशा झा) पण बसली आहे, म्हणून शब्द सांभाळतो. पण ते काय म्हणाले.. नाक घासडत आणला नाही तर नावाचा नाही अमका-तमका नाही. पुण्यातील जेलमधून बाहेर पडल्यावर मीही म्हणालो, तुम्हाला ठोकला नाही, तर नावाचा हर्षवर्धन नाही. तुम्ही आमच्या तालुक्यात झेंडे लावता आणि तुमच्या पोरीची बॅग धरायला लावला. मेलो तरी चालेल, पण आता झुकणार नाही.” असा इशारा हर्षवर्धन जाधवांनी रावसाहेब दानवेंना दिला.
“खाजगी आयुष्यात मी 2003 ला चूक केली आणि भोगली”
“माझे वडील आयएएस ऑफिसर होते. कलेक्टर होते. ऐशोआरामाचं आयुष्य सोडलं आणि मातीत बसलेल्या माणसाला देव मानला. जिथे ज्वारी-बाजरी पिकत नव्हती, तिथे ऊस पिकवला. धरणं बांधली, कधी दारु वाटली नाही, पण पाणी आणलं, शेतकऱ्यांना समृद्ध केलं. यापुढे तुम्ही चुका करु नका. खाजगी आयुष्यात मी चूक केली. 2003 ला चूक केली आणि भोगली. पण आता नाही, यापुढे इथे रायभान जाधवांचीच संस्कृती चालणार” असा एल्गार हर्षवर्धन जाधवांनी केला.
औरंगाबादमधील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांचा नवा वारसदार कोण, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. आधी जाधव यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव यांच्याकडे समर्थकांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर चित्र पालटलं. रिंगणात उडी घेत हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य जाधवने कन्नडमधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली. परंतु औरंगाबादमधील पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या या दोघांच्याही पॅनेल्सना पराभवाची धूळ चाखावी लागली. महाविकास आघाडीने हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा धुव्वा उडवला.
हर्षवर्धन जाधव, संजना जाधव आणि रावसाहेब दानवे यांचे नातेसंबंध एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेले आहे. हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई, तर संजना जाधव यांचे पती. हर्षवर्धन जाधव यांनी अनेक वेळा रावसाहेब दानवे यांच्यावर बेछूट आरोप केलेले आहेत. त्यामुळे सासरे-जावई यांच्यातील वाद सर्वदूर पोहोचला आहे.
इशा झा यांच्या भाषणाची चर्चा
हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड मतदारसंघात आयोजित त्यांच्या सहकारी, मैत्रीण इशा झा यांनी भाषण केलं. जाधवांच्या मातोश्री तेजस्विनी जाधव यांचे आशीर्वाद घेत इशा झा यांनी भाषणाला सुरुवात केली. “मी जेव्हा हर्षवर्धन जाधव यांना भेटले, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांचं शिक्षण लंडनमधून झालं आहे. ते जेव्हा कलेक्टर, लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांशी बोलतात, तेव्हा हर्षवर्धन यांच्या ज्ञानाने तेही गपगार होतात. आणेवारी, वीज कनेक्शन, आरोग्य, हायवे बांधकाम असा कुठलाही विषय असो, त्यांचा अभ्यास खूप आहे” अशा शब्दात इशा झा हर्षवर्धन जाधवांचं कौतुक करत होत्या. (former MLA Harshavardhan Jadhav praises son Aditya Jadhav who fought against Raosaheb Danve)
कोण आहेत इशा झा? (Who is Isha Jha Read Profile)
इशा झा या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या सहकारी. जाधव यांच्या साथीने त्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना बालपणापासूनच समाज कल्याणाविषयी मनात तळमळ होती. मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबात इशा झा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मेकॅनिक होते. शिक्षण, आरोग्य अशा विषयात इशा झा यांनी काम केलं आहे.
दुचाकीस्वार मारहाण प्रकरणी चर्चेत
हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इशा झा यांनीही संगनमताने शिवीगाळ करत हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप तक्रारदार अमन अजय चड्डा यांनी केला होता.
संबंधित बातम्या :
राजकारणाचा अजब डाव : हर्षवर्धन जाधव Vs पत्नी संजना जाधव Vs मुलगा आदित्य जाधव
तेजस्विनी जाधवांच्या आशीर्वादाने सभेत भाषण, हर्षवर्धन जाधव यांची मैत्रीण इशा झा यांची चर्चा
ना आदित्य हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव; मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे
हर्षवर्धन जाधवांसह महिलेला मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा नोंदवा, कोर्टाचे आदेश