अहमदनगर : भाजपची अहमदनगरमध्ये डोकेदुखी वाढली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार आणि भाजपचे बंडखोर नेते भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिर्डीमधून शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर नाराज झालेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
शिवसेना आणि भाजप युतीमध्ये शिर्डी हा राखीव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे. वाकचौरे यांनी लोखंडेंवर विकास कामावरून टीका केली. निवडून आल्यानंतर साडेचार वर्षे मतदारसंघात कुठलाही विकास केला नसल्याचा आरोप करत जनतेच्या हितासाठी आपण अपक्ष उमेदवारी करत असल्याचं भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्पष्ट केलं.
अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर आघाडी आणि युतीला संघर्ष करावा लागतोय. अगोदर भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापून नुकतेच भाजपात आलेले सुजय विखे यांना तिकीट दिलं. तर सुजय विखेंचं वडील काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील नाराज असल्यामुळे आघाडीचीही डोकेदुखी आहे. त्यातच भाजपमधून बंडखोरी झाल्याने आता युतीचीही डोकेदुखी वाढणार आहे.
महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात शिर्डी मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.