पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिरूर मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे अशी तुल्यबळ लढत झाली होती. महायुतीच्या जागावाटपमध्ये ही जागा अजितदादा गटाने मागून घेतली होती. त्यामुळे पुर्वाश्रमीचे शिवसेना खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. परंतु, या निवडणुकीत शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घरवापसी करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्ष फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांनी पुन्हा 2024 ची निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, महायुतीच्या जागावाटपात शिरुरची जागा अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 26 मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण, 2024 च्या निवडणुकीत शिवाजी आढळराव पाटील यांना पुन्हा पराभवाचा धक्का बसला.
शिवाजीराव पाटील यांनी शिरूर येथे आखाड पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर आणि हवेली तालुका शिवसेनेचे अध्यक्ष विपुल शितोळे हे देखील या पार्टीला उपस्थित होते. या नेत्यांनी आढळराव पाटील यांना पुन्हा स्वगृही परतण्याची विनंती केली. त्यांच्या या मागणीला शिवसैनिकांनी प्रतिसाद दिला. शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयाचा फायदा झाला नाही. उलट तोटाच झाला अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून आढळराव पाटील भावूक झाले होते. त्यामुळे ते घरवापसी करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.