जालना/सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी अखेर भाजपात प्रवेश केलाय. जालना येथील भाजप कार्यकारणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ढोबळेंनी भाजप पक्षात प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून ढोबळे हे भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत होते.
यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चरणस्पर्श केल्याचेही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर मागील आठवड्यात दानवे यांच्या सोलापूर दौऱ्यात ढोंबळेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. मात्र माझ्या उपस्थितीतच प्रवेश करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानुसार अखेर सोमवारी ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ढोबळेंच्या प्रवेशाने त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार की विधानसभेची उमेदवारी मिळणार याबाबत जिल्हाभरात चर्चेला ऊत आलाय.
कोण आहेत लक्ष्मण ढोबळे?
लक्ष्मण ढोबळे हे 2009 मध्ये सोलापुरातील मोहोळ-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार होते. त्यांच्याकडे पाणीपुरवठा मंत्रालयाची जबाबदारी होती. 2014 साली त्यांच्या एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाचा निकाल लागत नसल्याने ढोबळेंचा भाजप प्रवेशही लांबला. वाचा – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा ए टू झेड आढावा
लक्ष्मण ढोबळे यापूर्वी 2015 मध्ये चर्चेत आले होते. राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांवर कडाडून टीका केली होती. अजित पवारांनी अगोदर रामदास आठवले आणि ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांचा काटा काढला. आता ते मलाही संपवायला निघाले आहेत, पण यातून राज्यातील परिवर्तनवादी चळवळ कधीही संपणार नाही, तर उलट आम्ही दलित नेते एकत्र येऊन राष्ट्रवादीलाच त्याची किंमत मोजायला लावू, असा थेट इशारा ढोबळे यांनी दिला होता. विधानसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याने राष्ट्रवादीवर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. लक्ष्मण ढोबळे यांचं तिकीट कापून राष्ट्रवादीने रमेश कदम यांना तिकीट दिलं होतं. रमेश कदम सध्या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत.
लक्ष्मण ढोबळे यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाते, की लोकसभेची याबाबत अजून काहीही स्पष्टता नाही. पण त्यांना जर लोकसभेची उमेदवारी दिली तर त्यांची थेट लढत काँग्रेसचे संभावित उमेदवार आणि ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्यासोबत होईल.
सध्या सोलापुरात भाजपचे शरद बनसोडे खासदार आहेत. पण त्यांच्या सुमार कामगिरीमुळे जनताच नव्हे, तर भाजप नेतृत्त्वही त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे बनसोडेंचं तिकीट जवळपास कापल्यात जमा आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार अमर साबळेही सोलापूर लोकसभेसाठी तयारीला लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे लक्ष्मण ढोबळेंना कोणती उमेदवारी मिळते त्याकडे लक्ष लागलंय.
संबंधित बातमी :