नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली (Arun Jaitley) उपचारासाठी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल झाले आहेत. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना (Arun Jaitley) शुक्रवारी सकाळी 11 वाजताच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाने कळवलं आहे. सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही एम्समध्ये जाऊन अरुण जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेटलींनी यावेळी मंत्रिपद न सांभाळता विश्रांतीचा निर्णय घेतला होता.
अरुण जेटली यांची देखरेख एंडोक्रिनोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट आणि कार्डियोलॉजिस्ट डॉक्टरांकडून केली जात आहे. कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. के. बहल यांच्या देखरेखीत जेटलींवर उपचार सुरु आहेत. आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही एम्समध्ये जाऊन जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरुण जेटली उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांनी यावेळी कॅबिनेटमध्ये घेऊ नये, अशी विनंतीही पंतप्रधान मोदींना केली होती. गेल्या 18 महिन्यांपासून मी आजारपणाशी संघर्ष करतोय, त्यामुळे माझा मंत्रिमंडळात समावेश न करण्याबाबत विचार करावा, असं पत्र जेटलींनी लिहिलं होतं.
गेल्या वर्षी अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर जेटलींना पायात सॉफ्ट टिशू कॅन्सर झाला. जानेवारीमध्ये जेटली उपचारासाठी अमेरिकेलाही गेले होते. अमेरिकेहून परतल्यानंतर त्यांनी घरीच राहून विश्रांती करण्याचा निर्णय घेतला.