नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांचे आज (28 जुलै) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
एस.जयपाल रेड्डी हे गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनिया आजाराने ग्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र शनिवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले.
We are saddened to hear of the passing of former Union Minister Jaipal Reddy. A senior Congress leader, he served as an LS MP 5 times, an RS MP 2 times and as an MLA 4 times.
We hope his family and friends find strength in their time of grief. pic.twitter.com/3BHVc07OYA— Congress (@INCIndia) July 28, 2019
जयपाल रेड्डी यांचा अल्पपरिचय
जयपाल रेड्डी यांचा जन्म 16 जानेवारी 1942 रोजी तेलंगणा येथील माडगूळ गावात झाला. काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. जयपाल रेड्डी हे आंधप्रदेशातून 4 वेळा आमदार आणि 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत.
आणीबाणीच्या काळात त्यांनी काँग्रेसविरोधात बंड पुकारले. त्यानंतर काही काळ त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी जनता दलात प्रवेश केला. 1985 ते 1988 या काळात जनता दलाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा घरवापसी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांच्या कार्यकाळात रेड्डी यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांच्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना 1998 मध्ये उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.