मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने शिवसेनेला (Shivsena) सर्वात मोठा झटका बसला आहे. असाच आता आणखी एक मोठा झटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे चार खासदार (Shivsena MP) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. आता भाजपसोबत जाण्याची वेळ आली आहे, अशी मागणी या खासदारांची आहे. त्यामुळे राज्यात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यापासून शिवसेनेतली गळती थांबत नाहीये. गेल्या अनेक दिवसात अनेक नेत्यांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. एकापाठोपाठ एक नेते हे एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी आमदारांना गुवाहाटीत घेऊन थांबले होते त्या ठिकाणी पोहोचले. तर आधीपासून काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ होते. श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांनी कोणत्याही बैठकांना हजेरी लावली नव्हती. आता शिवसेनेतली हीच गळती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आताची सर्वात मोठी बातमी
शिवसेनेचे 4 खासदार फडणवीसांना भेटले
शिवसेनेसोबत युती करा-4 खासदारांची मागणी
देवेंद्र फडणवीसांना 4 खासदार भेटले
टीव्ही 9 मराठीला सूत्रांची माहिती@TV9Marathi @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @OfficeofUT— mohan deshmukh (@mohanekanshi) July 3, 2022
या बंडाच्या पहिल्या दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे हे ठाकरेंच्या संपर्कात नव्हते. एवढच नाही तर भावना गवळी याही शिवसेनेच्या कोणत्याही बैठकीला दिसून आल्या नाहीत. मात्र इतर खासदार हे सर्व शिवसेनेच्या सर्व बैठकांना उपस्थित होते.
तर एक गट गेला म्हणून पक्ष जात नाही. त्यामुळे आत्ता कुणीही फुटणार नाही. आम्ही पुन्हा शिवसेनेला जोमाने उभं करण्यासाठी सज्ज आहोत. शिवसेनेची साथ आम्ही कधीच सोडणार नाही, अशा प्रतिक्रिया गेल्या काही दिवसात झालेल्या बैठकांनंतर शिवसेनेचे खासदार देत होते. मात्र दुसरीकडे अनेक खासदार हे एकानाथ शिंदे आणि भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता असल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात होत्याच. त्यामुळे आता फडणवीसांच्या या भेटीने हा सस्पेन्स आणखी वाढला आहे. फडणवीसांच्या भेटीत चर्चा काय झाली हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. मात्र लवकरच ही बाजुही बाहेर येण्याची शक्यता आहे. आता या खासदारांच्या मागणीने शिवसेनेचं टेन्शन मात्र नक्कीच आणखी वाढलं आहे.