नवी दिल्लीः उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह (Former Uttar Pradesh Chief Minister Mulayam Singh) यादव यांच्यावर लाखोंच्या उपस्थितीत आणि देशातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले आहे. त्यांचा चिरंजीव आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी साश्रू नयनांनी त्यांना मुखाग्नी दिला. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यानंतर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सैफई येथे जाऊन त्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला होता.
उत्तर प्रदेश सरकारने ‘धरतीपुत्र मुलायम सिंह यादव यांच्या मृत्यूबद्दल तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
मुलायम सिंह यांच्या सैफई या गावी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंचा संख्येने नागरिक उपस्थित होते. सोमवारी सकाळी गुरुग्राममध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर सायंकाळी त्यांचे पार्थिव सैफई येथे आणण्यात आले होते.
सैफईमध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यासह सर्व पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
सैफईमध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेले मुलायम सिंह यादव 7 वेळा खासदार आणि 10 वेळा आमदार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली होती. तसेच 3 वेळा यूपीचे मुख्यमंत्रीही झाले होते. 1996 ते 98 या काळात ते देशाचे संरक्षण मंत्रीही होते. मुलायमसिंह यादव हेही एकेकाळी पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार राहिले असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात
यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यास अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीतील उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी आणि पक्षाचे इतर नेतेही अंत्यसंस्कारासाठी सैफई येथे पोहोचले होते.
महाराष्ट्रातील अनेक नेते त्यांच्या अंत्यसंस्कारला उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे याही यावेळी उपस्थित होत्या.
माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.