भाजपची बुधवारी दिवसभर मेगाभरती, दिग्गज नेते काँग्रेस, राष्ट्रवादी सोडणार

| Updated on: Sep 10, 2019 | 9:59 PM

माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik joining BJP) यांचा नगरसेवकांसह भाजपात प्रवेश (Ganesh Naik joining BJP) होणार आहे. तर काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil joining BJP) यांचाही भाजप प्रवेश निश्चित झालाय.

भाजपची बुधवारी दिवसभर मेगाभरती, दिग्गज नेते काँग्रेस, राष्ट्रवादी सोडणार
Follow us on

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकानंतर एक धक्का बसणं सुरुच आहे. बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik joining BJP) यांचा नगरसेवकांसह भाजपात प्रवेश (Ganesh Naik joining BJP) होणार आहे. तर काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil joining BJP) यांचाही भाजप प्रवेश निश्चित झालाय. काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिल्याने तेही भाजपात बुधवारीच प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गणेश नाईकांकडून स्वतःच्या पक्षप्रवेशाची जय्यत तयारी

राष्ट्रवादीच्या 55 नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे जोरात तयारी सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी एक्झिबिशन सेंटरमध्ये गणेश नाईक आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांनी स्वतः तयारीचा आढावा घेतला.

वाशीमध्ये बुधवारी सायंकाळी 5 वाजता गणेश नाईक, संजीव नाईक, 55 नगरसेवक आणि हजारो समर्थकांचा भाजप प्रवेश होईल. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रायगड जिल्हा पालकमंत्री रविंद्र गायकवाड आणि भाजपचे इतर मातब्बर नेते हजर राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी साडे तीन हजार खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत.

हर्षवर्धन पाटील यांचाही भाजप प्रवेश

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा दुपारी 3 वाजता पक्ष प्रवेश होईल. यापूर्वीच त्यांनी पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितलं होतं.

हर्षवर्धन पाटील यांची कारकीर्द

  • राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते म्हणून ओळख
  • इंदापूर विधानसभा मतदारसंघांचे चार वेळा आमदार
  • सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम
  • मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती सरकारमध्ये पाच वर्षे मंत्री म्हणून काम
  • त्यानंतर आघाडी सरकारमध्ये 14 वर्षे मंत्री म्हणून काम
  • एकूण सहा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात कामाचा अनुभव
  • उत्कृष्ट संसदीय कार्यमंत्री म्हणून तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते विधीमंडळात गौरव
  • इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील नाराज
  • इंदापूरच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाची मागणी केली होती.
  • इंदापूर विधानसभेची जागा भाजपकडून लढवली जाण्याची शक्यता

कृपाशंकर सिंग यांचा राजीनामा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग (Kripashankar Singh resigns) यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. कृपाशंकर सिंग (Kripashankar Singh resigns) यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा सोपवला. कृपाशंकर सिंग हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. त्यातच या राजीनाम्यामुळे ते भाजपात जाणार हे निश्चित मानलं जातंय.

कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते आहेत. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 साली कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्याचं बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जातं, असं मानलं जातं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंग यांनी भूषवली आहेत.