लातूर : निवडणुकांच्या तोंडावर कुख्यात गुंड अरुण गवळीचा पक्षही सक्रिय झाला आहे. राज्यभर विधानसभा आणि लोकसभेच्या जागा लढवण्याची तयारी अखिल भारतीय सेनेने सुरु केली आहे. अरुण गवळीच्या पत्नी आणि अभा सेनेच्या सरचिटणीस आशा गवळी या सध्या राज्यभर फिरून कार्यकर्त्यांची फळी उभी करत आहेत. त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये नुकतीच सभा घेतली.
आरक्षण आणि जातीच्या नावावर राजकारण करून काही पक्ष लोकांमध्ये मतभेद निर्माण करत आहेत. मात्र आपला पक्ष हा केवळ लोकांच्या सेवेसाठी आहे. गवळी कुटुंबीयांचा त्यात काहीच स्वार्थ नसल्याचं आशा गवळी यांनी म्हटलं आहे. उदगीर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने आशा गवळी यांनी उदगीर इथे पक्षाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी त्या बोलत होत्या.
कुख्यात गुंड अरुण गवळी यांचा पक्ष म्हणून आखिल भारतीय सेनेची ओळख आहे. तरीही कार्यकर्त्यांची या पक्षाला राज्यभर कमतरता नाही. प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांचं जाळं उभं करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.
गँगस्टर अरुण गवळीने 1997 साली अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली. अरुण गवळीने त्याच्या पक्षाच्या वतीने 2004 सालची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईत त्याने जवळपास 26 टक्के मतं मिळवली होती. पण त्याचा पराभव झाला. त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय सेनेच्या 20 उमेदवारांनी निवडणूक लढवली, पण अरुण गवळी वगळता एकही उमेदवार निवडून आला नाही.
अरुण गवळी सध्या शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगत आहे. ऑगस्ट 2012 मध्ये त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. अरुण गवळी तुरुंगात गेल्यानंतरही त्याच्या पत्नीकडून पक्षबांधणी सुरु आहे.