मुंबई : आम्हाला सुरतमधून बाहेर काढा, अशी मागणी एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) फोन करून केली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय. नाराज एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 35 आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. शिंदे सध्या 35 आमदारांसह सुरतमध्ये आहेत. मात्र, त्यातील एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कळते आहे. तर काही आमदारांच्या कुटुंबियांनी अपहरण झाल्याचीही तक्रार पक्षाकडे केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. यातच आता शिवनेसेनेच्या (Shivsena) एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा हे आमदार शिवसेनेकडे परतणार का, हा प्रश्न देखील सध्या चर्चेत आहे.
अनेक आमदारांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली. अकोल्याचे आमदार नितीश देशमुख यांच्या पत्नीने तक्रार केली आहे. देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांना जबरदस्तीने सुरतला नेण्यात आल्याचं त्यांच्या पत्नीने म्हटलं आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत नऊ आमदारांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली आहे. हे असच सुरू राहिलं तर मुंबई पोलिसांना या संदर्भात कठोर अॅक्शन घ्यावी लागेल, असं राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरचं शिवसेनेचं नाव हटवलं आहे. यामुळे शिंदेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, असं बोललं जातंय. महाविकास आघाडी सरकार शिंदेंच्या बंडाळीमुळे सरकार पडण्याची शक्यता आहे. यातच आता एकनाथ शिंदे गटनेते पदावरुन मागे हटणार नसून त्यांच्याकडे 35 आमदार असल्यानं गटनेतेपदावरुन त्यांना हटवलं जाऊ शकत नाही, असा कयास बांधला जातोय. तर शिवसेनेकडे फक्त चौदा आमदार राहिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंचा गट, अशी परिस्थिती सध्या शिवसेनेत निर्माण झाली आहे.
नऊ आमदारांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली आहे.