नवी दिल्लीः देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच काँग्रेसचे (Congress Party) ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षावर आभाळ कोसळल्याची स्थिती आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि गांधी परिवार (Gandhi Family) घेत असलेल्या निर्णयांमध्ये अनुभवी नेतृत्वाच्या शब्दाला काहीच वजन नसल्याची बाब अनेक ज्येष्ठांच्या जिव्हारी लागतेय, असा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केलाय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाच पानी पत्र लिहित गुलाम नबी आझाद यांनी अत्यंत सविस्तरपणे आपली नाराजी दर्शवली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कात टाकतंय, देशाला एक प्रबळ विरोधी पक्ष मिळणार, अशी चर्चा सुरु असतानाच पक्षावर झालेला हा मोठा आघात अनेक पातळ्यांवर नुकसान करणारा ठरणार आहे. यापैकी काही महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे-
गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 28 ऑगस्ट रोजी या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक सोनिया गांधीं बोलावली होती. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून महत्त्वाचे निर्णय तसेच अध्यक्षनिवडीची तारीखही ठरणार होती. मात्र गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने कार्याकारिणीला मोठा धक्का बसला असून अध्यक्षपद निवडीची प्रक्रिया आणखी लांबण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पुन्हा एकदा तयारीला लागण्याची आशा होती. मात्र गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या नाराजीच्या पत्रात काँग्रेसमधील दोषांवर नेमके बोट ठेवले आहे. काँग्रेसमध्ये आता इच्छाशक्तीच राहिलेली नाही. राहुल गांधी यांच्या भोवती नेहमीच अनुभवहीन माणसे असतात, वरिष्ठांना त्यांच्या अनुभवानुसार पदे दिली जात नाहीत, असे गंभीर आरोप केल्याने पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे जनमानसात काँग्रेसच्या प्रतिमेला मोठा तडा जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम निश्चित आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील मतदानावर दिसून येईल.
काँग्रेसमुक्त देश असा नारा देणाऱ्या भाजपने बघता बघता देशातील बहुतांश राज्यांवर सत्ता स्थापन केली आहे. देशातील काही राज्यांतच काँग्रेस प्रबळ स्थितीत आहे. मात्र एकानंतर एक महत्त्वाचे नेते पक्ष सोडून जात असल्याने कार्यकर्त्यांना कसे बळ देणार, असा प्रश्न काँग्रेससमोर आहे.
देशात येत्या काही दिवसात गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह जम्मू काश्मीरमध्येही निवडणूक होणार आहे. मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी 47 वर्षांचे वकार रसूल वानी यांना जम्मू काश्मीर युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती दिली तर 73 वर्षी आझाद यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख बनवले. याच मुद्द्यावरून तीव्र नाराजी आझाद यांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हा राज्यातील काँग्रेसचा प्रभावी चेहरा होता. मात्र त्यांनीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने जम्मू काश्मीर विधानसभेत काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो.
गुलाम नबी आझाद हे काँग्रेसच्या जी २३ समूहाचे प्रमुख सदस्य आहेत. मात्र त्यांनीच पक्ष सोडल्यामुळे पक्षातील इतर नाराजांनाही बळ मिळण्याची शक्यता आहे. गुलाम नबी आझाद यांच्यासह आनंद शर्मा, मनीष तिवारी आणि भूपेंद्र सिंह हुडा असे अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. अशा दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडल्यास काँग्रेसमध्ये भूकंप येऊ शकतो…
भाजपविरोधात लढताना वर्षानुवर्षांपासून मुस्लिम व्होट बँकेचा काँग्रेसला नेहमीच मोठा फायदा झालाय. आाझाद हे राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेसचा मुस्लिम चेहरा होते. मात्र त्यांनीच काँग्रेस सोडल्याने मुस्लिम समाजात काँग्रेसविरोधी मेसेज जाऊन मुस्लिम व्होट बँकेला धक्का लागण्याची शक्यता आहे..