जळगाव : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) मुद्द्यावरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या रुपात सहावा उमेदवार देण्यात आला आहे. तर भाजपकडूनही आता धनंजय महाडिकांच्या रुपात तगडा उमेदवार मैदानात उतरवण्यात आलाय. अशावेळी दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्यसभा उमेदवारीवरुन भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. राज्यसभेसाठी भाजपनं अनिल बोंडे यांना उमेदवारी दिल्यानं संजय राऊत यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर बोलताना गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर टीका केलीय.
गिरीश महाजन म्हणाले की, मागच्या काळात शिवसेनेनं निष्ठावंतांना उमेदवारी का दिली नाही? त्यावेळी त्यांनी राजकुमार धूत, ब्रिटिश नंदी, प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आले. तसंच महाजन यांनी शिवसेनेला स्थानिक आणि निष्ठावानांची आठवण करुन दिली. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून येतील. कारण आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित होईल, असा दावाही गिरीश महाजन यांनी केलाय.
महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरत आहेत. तुम्ही मात्र माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी यातच गुरफटून पडले, असा टोला महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शन प्रणालीच्या माध्यमातून आज लाभार्थी संवाद कार्यक्रमात जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी गिरीश महाजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात उपस्थित होते. त्यानंतर महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. कोल्हापुरातून भाजपने एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली. पण हा त्यांचा प्रश्न आहे. मला आश्चर्य वाटतं दोन्ही उमेदवार राज्यसभेचे भाजपचे नाहीत. बाहेरचे आहेत. जे निष्ठावंत आहेत. जे संघपरिवाराशी संबंधित आहेत. त्यांना डावलल्याचं वाचलं. जे इतर पक्षातून आलेत ते फक्त शिवसेनेवर किंवा महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात अशा लोकांना उमेदवारी दिली आहे. भाजपने उमेदवारी दिलेली विदर्भातील एक व्यक्ती शिवसेनेत होती. शिवसेनेत काम केलं. दुसरा उमेदवार हा शिवसेना, कधी राष्ट्रवादी असा प्रवास करून आला आहे.त्यामुळे त्यांच्या पक्षातच नाराजी आहे. हा जुना भाजप राहिला नाही. अशाच लोकांनी एकत्र येऊन हा पक्ष ताब्यात घेतला आहे. पण आम्ही निष्ठावंतांना उमेदवारी दिली आहे, असं राऊत म्हणाले.