मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसत आहे (Girish Mahajan meet CM Uddhav Thackeray). एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याआधीच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महाजन यांनी स्वतःच याविषयी पत्रकारांना माहिती दिली. तसेच ही कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटल्याचंही स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या महाजन यांनी मुख्यमंत्र्यांशी नेमकी काय चर्चा केली, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे.
गिरीश महाजन म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांची भेट कोणीही घेऊ शकतो. मी आत्ता उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यात चुकीचं काय? मुख्यमंत्र्यांना सर्वांनाच भेटावं लागतं. एकनाथ खडसे कामानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटू शकतात. कामासाठी भेटले तर त्यात काहीही चुकीचं नाही.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. सर्वजण सर्वांनाच भेटत असतात. मीही अनेकांना भेटतो. याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने संपर्कात आहोत, असा अर्थ होत नाही. एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्ष सोडणार नाहीत. ते नाराज असतील तर दिल्लीतील नेते त्यांच्याशी बोलतील. त्यांची नाराजी कमी होईल. ते नेमके कोणावर नाराज आहेत हे माहिती नाही, असंही गिरीश महाजन यांनी नमूद केलं.
नाथाभाऊ आमचे जुने सहकारी : मुख्यमंत्री
नाथाभाऊ आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. मी त्यांना भेटणार आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी काल दिल्लीत जाऊन भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं होतं.
एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी खडसे यांना भेटीची वेळ देणार असल्याचं नमूद केलं आहे.