सातारा | 18 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात महाआघाडी आणि महायुतीत जागावाटपाचा जांगडगुत्ता सुरुच आहे. सातारा येथील राजघराण्याचे वारसदार उदयनराजे भोसले यांचं नाव भाजपाच्या यादीत नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे संकटमोचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज सातारा येथे येऊन जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंददाराआड नेमकी काय खलबतं झाली याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची देशपातळीवरील दुसरी आणि राज्यातील पहिली याची जाहीर झाली आहे. त्यात महाराष्ट्रातील अनेक जागांवरील उमेदवारांचा समावेश नसल्याने धाकघुक वाढली आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांत त्यामुळे जागांसाठी चढाओढ सुरु आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांनी तयारी सुरु केली आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र पाटील इच्छुक आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले हे भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत. भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत. मात्र भाजपच्या लोकसभा उमेदवारीच्या दोन यादा जाहीर होऊन देखील खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर न झाल्यामुळे उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते आणि साताऱ्यातील मराठा सकल समाज आक्रमक झालेला आहे. यातच आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यात नेमकी काय चर्चा सुरु आहे याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या ‘सुरुची पॅलेस’ या निवासस्थानी जाऊन त्यांचीही भेट घेतल्याचे महाजन यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांशी बंददाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी साताऱ्यात आलो असून आज दोन्ही राजेंची भेट घेऊन सातारा लोकसभेचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. साताराच नव्हे तर इतर लोकसभा मतदारसंघासह पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेची नेमकी काय परिस्थिती आहे ? याविषयी देखील जाणून घेतल्याची प्रतिक्रिया महाजन यांनी दिली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीतील चर्चेचा तपशील मात्र त्यांनी कळू दिलेला नाही. हा मतदार संघ भाजपकडे राहिला पाहिजे सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे, हा निरोप वरिष्ठांना पोहोचवावा असे आपण महाजन यांना सांगितल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
उदययन राजे यांच्याशी आपली भेट झाली. भेटीत चांगली चर्चा झाल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले. सातारा लोकसभेसाठी महायुतीतून तीनही पक्षातील उमेदवार इच्छुक असल्यामुळे साताऱ्याची उमेदवारी जाहीर होण्यास थोडा वेळ लागत असल्याचे महाजन यांनी सांगितले. माढ्यातून विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्याबाबत भाजपातच नाराजी असली तरी चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.