गौतम बैसाने, TV9 मराठी, प्रतिनिधी, धुळे : यंदाचा दसरा मेळावा जंगी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा. या मेळाव्याला भाजपचे नेते उपस्थित राहतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्याचं उत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दसरा मेळाव्याला भाजपचे नेते जाणार नाहीत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला भाजपचे नेते जाणार नाहीत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. पण तरीही शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आणि काही ठरलं असेल तर त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असंही ते बोलले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील दसरा मेळाव्याला जाण्याबाबतच विधान केलंय. उद्धव ठाकरेंनी मला आमंत्रण दिलं तर मी दसरा मेळाव्याला जाईल, असं नारायण राणे म्हणाले. पण उद्धव ठाकरे मला आमंत्रण देणार नाहीत, हे माहिती आहे, असंही राणे म्हणाले आहेत.
शिवसेनेत दोन गट झाल्याने पक्ष विभागला गेलाय. अशात आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही दसरा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यातून शिंदे उद्धव ठाकरेंना काय उत्तर देणार हे पाहाणं महत्वाचं असेल.
सध्या 20 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असे संकेत महाजनांनी दिलेत. मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीत होईल, असं महाजन म्हणालेत. मागच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही म्हणून टीका झाली. त्यामुळे या विस्तारावेळी महिलांना स्थान मिळतं का हे पाहणं महत्वाचं असेल.