मुंबई : मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झाला असताना, भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan on Swearing-in ceremony) यांनी युतीला दिलासा देणारं वक्तव्य केलं आहे. भाजपची आज नेता निवडीसाठी बैठक होत आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळ नेता म्हणून निवडलं जाईल. या बैठकीसाठी भाजपचे दिग्गज नेते हजर आहेत. या बैठकीपूर्वी गिरीश महाजन Girish Mahajan on Swearing-in ceremony) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाजन म्हणाले, “लोकांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे. शिवसेना- भाजप मिळून आम्ही सरकार स्थापन करु. आज भाजपशिवाय रिपाई आणि इतर भाजपचे मित्र पक्ष असतील. शिवसेना मात्र बैठकीला नाही”.
शपथविधी एकटया भाजपचा होणार नाही, तर शिवसेना-भाजपचा सोबत होईल, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. शिवाय भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करुन तोडगा काढतील असंही महाजन म्हणाले.
सत्तासंघर्षासाठी वेळ लागत नाही. 2-3 दिवसात तिन्ही नेते एकत्र बसतील त्यानंतर निर्णय होईल. नंतर महायुतीचं सरकार स्थापन होईल.
आमच्याकडं 17-18 अपक्ष आहेत, त्यांच्याकडं 5 अपक्ष आहेत. आम्ही कुठलीही अपक्षांची भिक मागत नाहीत. हे राजकारण आहे, असं महाजन म्हणाले.
‘मुख्यमंत्री मीच’
दरम्यान, काल देवेंद्र फडणवीस यांनी “पुढील पाच वर्ष आपणच मुख्यमंत्री असू. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपदावरुन कोणताही ठराव झालेला नाही”, असं सांगितलं. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वादानंतर सेना-भाजपची कालची बैठक रद्द झाली. शिवाय शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांचा जुना व्हिडीओ शेअर करुन, ठरलेल्या फॉर्म्युल्याची आठवण करुन देण्यात आली.
शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद?
दरम्यान, भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद देऊ केलं आहे. याशिवाय 16 मंत्रिपदेही देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. मात्र मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपने स्पष्ट नकार दिला आहे.