जळगाव : भाजप (BJP) नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा केवळ वाणी, ब्रह्मणांचा पक्ष नसून तो खडसे, मुंडे, महाजन यांचा बहुजनांचा पक्ष आहे, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला आहे.
गिरीश महाजनांनी खडसेंच्या वक्तव्यावरून त्यांना जोरदार टोला लगावला आहे. एकनाथ खडसे जे बोलले ते बरोबरच बोलले. कोण म्हणत आमचा पक्ष हा वाणी, ब्रह्मणांचा आहे. आमचा पक्ष मुळातच बहुजनांचा आहे. आमचे 105 आमदार असतील, आमच्याकडे इतक्या मोठ्या संख्येनं खासदार आहेत, एवढेच काय आमचे सर्व पदाधिकारी आणि मंत्री सुद्धा बहुजनांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये कुठेही ब्राह्मण किवा वाणी समाजाची संख्या अधिक नाही. मात्र खडसेंनी बोलताना हे लक्षात घ्यावे, की माणूस हा नुसता जातीने आणि समाजामुळे मोठा होत नाही, असं महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना महाजन यांनी एकनाथ खडसेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. खडसेंनी एक लक्षात घ्यावं माणूस हा केवळ जाती, धर्मामुळे मोठा होत नाही तर तो त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळे आणि नेतृत्वक्षमतेमुळे मोठा होतो. कुणीही सांगेल, अवघा महाराष्ट्र सांगेल की देवेंद्र फडणवीस यांची क्षमता काय आहे ती? खडसेंना खूप वाटतं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण जनतेला ते वाटायला हवंना. त्यामुळे खडसेंनी एकदा आत्मपरीक्षण करावे असं महाजन यांनी म्हटलं आहे.