मुंबई | 7 फेब्रुवारी 2024 : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हं अखेर अजित पवार यांच्या गटाला दिले आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठ्ठा धक्का असल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक आयोगाचा निर्णयावर प्रचंड टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केला आहे. अजितदादांचे आपण स्वागत करीत आहे. मी आधीपासून सांगत होतो की लोकशाहीत ज्याचे बहुमत त्याचाच पक्ष असतो असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी पक्षा संदर्भात काल निवडणूक आयोगाचा निकाल आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यावर निवडणूक आयोग मॅनज झाला आहे. या मागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. त्याचा समाचार ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. लोकशाहीत ज्याचे बहुमत त्याचाच पक्ष असतो. 55 आमदारांपैकी शिवसेनेत 10 आमदारही राहीलेले नाहीत. राष्ट्रवादीची देखील तिच परिस्थिती झालेली आहे. त्यांच्याकडे खासदार शिल्लक राहीलेले नाहीत. 80 टक्के आमदार, खासदार जेव्हा एका बाजूला जातात त्यावेळी काहीही पर्याय नसतो. त्यामुळे आयोगाने अतिशय योग्य निर्णय दिला असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
जसे पेरतो तसे उगवते, मागे पवार साहेबांनी तेच केलं. पवार साहेबांनी पक्ष फोडला नव्हता का ? पवार साहेब बाहेर पडून मुख्यमंत्री झाले नव्हते का ? ही त्यांची परंपरा आहे मग आता का वाईट वाटते ? आपण केलं तर ते चांगलं आणि अजित दादांनी केलं ते वाईट अशी दुहेरी भूमिका चालणार नाही असे गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले आहे.
भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत विचारता ते म्हणाले की मला याबाबत काही माहीती नाही. राज ठाकरे आणि आमचे काही मतमतांतर नाही…आमचे विचार काही वेगळे नाहीत, काय होईल काय नाही माहीत नाही..पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील असे महाजन यांनी यावेळी सांगितले. संजय राऊत यांचा भोंगा सकाळीच सुरु होतो अशी टीकाही महाजन यांनी केली आहे.