पणजी: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोवा विधानसभेबाबत अनोखं भाष्य केलं आहे. गोवा विधानसभा मुदतीआधीच भंग होईल आणि गोवा सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी पणजी इथं केली. गोव्यातील सध्याची परिस्थिती, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबतचं भाष्य केलं.
पणजी इथं गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे यांच्या 80 व्या वाढदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गोवा विधानसभा मुदतीआधीच भंग होईल असं भाष्य केलं. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “भाजपशासित गोवा सरकारचं पतन जवळ आलं आहे. मला विश्वास आहे गोवा सरकार कोसळेल आणि सध्याची विधानसभा भंग होईल.”
काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार आणि गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनीही असं वक्तव्य केलं होतं. ज्या दिवशी विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर खुर्ची सोडतील किंवा त्यांना काही झालं तर राज्यातील भाजप सरकारवर संकट येईल. जोपर्यंत मनोहर पर्रिकर मुख्यमंत्रीपदी आहेत, तोपर्यंत सरकारवर कोणतंही संकट नाही, असं खुद्द भाजप आमदार मायकल लोबो म्हणाले होते. त्यावरुन गोव्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज बांधता येऊ शकतो.
सध्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावलेलीच असते. त्यावरुन भाजप आमदार मायकल लोबो यांनी गोवा सरकारबाबत वक्तव्य केलं होतं.
शेवटपर्यंत गोव्याची सेवा करेन – पर्रिकर
प्रकृती बरी नसतानाही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी गोव्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी ते खुर्चीवर बसलेले होते आणि त्यांच्या नाकात ट्यूबही होती. अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पित होऊन गोव्याच्या जनतेची सेवा करेन, असं आश्वासन त्यांनी दिलं. शिवाय मी पूर्ण शुद्धीत आहे आणि उत्साहही तेवढाच आहे, असंही ते म्हणाले.
राहुल गांधी पर्रिकरांच्या भेटीला
राहुल गांधी यांनी गोव्यात जाऊन मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. पर्रिकर सध्या कॅन्सरने त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरु असतानाही ते मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. राहुल गांधी यांनी ही खाजगी भेट असल्याचं सांगितलं आणि पर्रिकरांच्या प्राकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली. पण दुसऱ्याच दिवशी जाहीर सभेत या भेटीचं राजकारण करण्यात आल्याने पर्रिकर नाराज झाले.
संबंधित बातम्या
शेवटपर्यंत गोव्याची सेवा करेन; नाकातल्या ट्यूबसह पर्रिकर म्हणाले How’s The Josh?
राहुल गांधी आधी म्हणाले भेट राजकीय नव्हती, आता जाहीर सभेत खळबळजनक दावे
पर्रिकरांच्या बेडरुममध्ये राफेलची फाईल? काँग्रेसकडून ऑडिओ क्लिप जारी