मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assemble Election) यंदा सर्वच राजकीय पक्षातील अंतर्गत बंडाळी आणि पक्षांतरामुळे चांगलीच गाजली. त्यातच भाजप, काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी यांच्यासह तृणमूल कांग्रेस, आप, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोवा रिव्होल्यूशनरी पक्षामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी लढत पाहायला मिळाली. तसंच माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) हे भाजपनं तिकीट नाकारल्यानं पणजीतून अपक्ष म्हणून मैदानात उतरले. तर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं त्यांनीही भाजपविरोधात दंड थोपटले. या पार्श्वभूमीवर यंदाची गोवा विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली. अशावेळी गोव्यातील हायव्होल्टेज लढतीत कोणता पक्ष आणि उमेदवार बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. यासंबंधी ‘द स्ट्रेलेमा’ पुणे या संस्थेचा एक्झिट पोल समोर आलाय.
पणजी विधानसभा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ राहिलाय. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून बाबूश यांना संधी मिळाली. यंदा या मतदारसंघातून पर्रिकर यांचा मुलगा उत्पल यांनी उमेदवारी मागितली. पण भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंड पुकारत भाजपपुढे आव्हान निर्माण केलं. मात्र, बाबूश यांची पणजी पालिकेवर सत्ता असल्यामुळे आणि सोबतच बाजूच्या तालेगाव मतदारसंघात त्यांची पत्नी आमदार असल्यानं त्याचा लाभ बाबूश यांना झाल्याचं पाहायला मिळतं. या निवडणुकीत उत्पल पर्रिकर यांना सारस्वत मतदारांव्यतिरिक्त अन्य मतदारांवर प्रभाव टाकता आलेला नाही. तर काँग्रेसचा पारंपरिक मतदार काँग्रेसला मतदान करताना दिसला. त्यामुळे पणजीत बाबूश यांचा विजय सुकर बनल्याचं ‘द स्ट्रेलेमा’चा एक्झिट पोल सांगतो.
मायकल लोबो हे भाजपच्या पारंपरिक कॅथलिक मतदारसंघासाठीचा सर्वात प्रभावी चेहरा होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कलंगुट मतदारसंघात लोबो यांना रोखू शकेल अशी रणनीती आखण्यास भाजपला अपयश आल्याचं दिसून आलं. त्यामुळे हा मतदारसंघ लोबो एकहाती जिंकतील असा अंदाज आहे.
सालेगावमध्ये भाजपने गोवा फॉरवर्ड पक्षातून आलेल्या विद्यमान आमदार जयेश साळगावकर यांना मैदानात उतरवलं होतं. तर लोबो समर्थक केदार नाईक यांना काँग्रेसकडून तिकीट मिळालं. अशावेळी विद्यमान आमदार साळगावकर यांच्याबाबत मोठी अँटी इन्क्मबन्सी पाहायला मिळाली. तसंच साळगावकर हे पाच वर्षातील कोणतही ठोस काम दाखवण्यात कमी पडले. सोबतच कॅथलिक मतदारांवर लोबोंचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे सालेगावातील मतदारांचा कल हा केदार नाईक यांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळत असल्याचा अंदाज आहे.
सिओलीमध्ये भाजपनं दयानंद मांद्रेकर यांना मैदानात उतरलं. तर काँग्रेसने मायकल लोबो यांच्या पत्नी डलायला लोबो यांना तिकीट दिलं. विद्यमान आमदार विनोद पालेकर अपक्ष तर कॅथलिक मतांवर प्रभाव असलेले पॅट्रिक आल्मेडा हे देखील अपक्ष रिंगणात उतरले होते. यात चार वेळा आमदार राहिलेले दयानंतर मांद्रेकर यांनी भंडारी समूह स्वत:कडे वळवण्यात यश मिळल्याचं दिसतं. तर कॅथलिक मतदार आणि लोबो कुटुंबियांचा आक्रमक प्रचार यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरली. या मतदारसंघात मतदारांचा कल हा भाजपकडे 42 टक्के, काँग्रेसकडे 40 टक्के, आल्मेडा यांच्याकडे 10 टक्के तर इतरांकडे 8 टक्के राहील असा अंदाज आहे.
कलंगुटला लागून असलेल्या या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जोशुआ डिसूजा यांचा विजय झाला होता. या मतदारसंघात त्यांच्या वडिलांनी अर्थात फ्रान्सिस डिसूजा यांनी पाच वेळा प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र, मागील काही वर्षात सुधीर कांदोळकर यांच्या माध्यमातून कडवं आव्हान निर्माण झालं होतं. मात्र, वडिलांची प्रतिमा आणि भंडारी समुहाला सोबत ठेवण्यात जोशुआ डिसूजा यांनी यश आल्याचं दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतदारांचा कल हा भाजपकडे 46 टक्के, काँग्रेसकडे 40 टक्के तर इतरांकडे 14 टक्के राहिल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.
थिवीम मतदारसंघात भाजपनं काँग्रेसमधून आलेल्या विद्यमान आमदार निळकंठ हळणकर यांना उमेदवारी दिली. तर विरोधातील कविता कांडोळकर याच मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य असल्यानं त्यांचा जनसंपर्क चांगला होता. काही वर्षातील अँटी इन्क्मबन्सी, जनसंपर्काचा अभाव आणि मतदारसंघातील निष्क्रियता यामुळे ही निवडणूक कविता कांदोळकर यांच्याकडे झुकताना पाहायला मिळतेय.
आल्डोना मतदारसंघात काँग्रेसनं कॅथलिक समाजाचे कार्लोस अलवारीस यांना उमेदवारी दिली. गोव्यातील नामांकित वकील आणि महाधिवक्ता राहिलेल्या कार्लोस यांची प्रतिमा जनसामान्याममध्ये चांगली दिसून येत होती. या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार ग्लेन टिकलो यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर टीएमसीकडून किरण कांदोळकर यांच्याकडून तगडं आव्हान उभं होतं. सुरुवातीला सोपी दिसणारी निवडणूक भाजपसाठी अवघड बनली. यात किरण कांदोळकर यांच्या माध्यमातून भाजपच्या भंडारी मतांमध्ये विभाजन दिसलं. तर कॅथलिक समूह मोठ्या प्रमाणात काँग्रेससोबतच राहिला. त्यामुळे तिरंगी लढत झालेल्या या मतदारसंघात काँग्रेस विजयी होईल असा अंदाज आहे.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपनं उमेदवारी नाकारत दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली. त्यात पार्सेकरांची बंडखोरी आणि एमजीपीच्या जीत आरोडकर यांचं तगडं आव्हान यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची बनली होती. सुरुवातीला भाजपसाठी अडचणीचा बनलेला हा मतदारसंघ पार्सेकर आणि अरोडकर यांच्यातील मतविभाजनामुळे भाजपच्या दयानंतर सोपटे यांच्याकडे झुकल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय.
>> पणजी – भाजप
>> कलंगुट – काँग्रेस
>> सालेगाव – काँग्रेस
>> सिओलीम – भाजप
>> म्हापसा – भाजप
>> थिवीम – टीएमसी
>> आल्डोना – काँग्रेस
>> मांद्रे – भाजप
>> मये – भाजप
>> बिचोलिम – एमजीपी
इतर बातम्या :