नागपूर : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना मोठा धक्का बसला आहे. कारण, सलग तीन वेळा निवडून आलेले काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल (MLA Gopaldas Agrawal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. गोंदिया जिल्ह्यातील वजनदार नेते म्हणून गोपालदास (MLA Gopaldas Agrawal) यांची ओळख आहे. सलग तीन वेळा आमदार असलेला नेता गेल्यामुळे आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, स्थानिक राजकारणात गोपालदास यांचा दबदबा आहे.
शिवसेनेसोबत युती झाली असून आज किंवा उद्या भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल, असं नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. गोंदियातील काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी नागपुरात भाजपात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. गोंदियाची जागा आम्ही कधीच जिंकलो नाही, पण आता जिंकू असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
डिसेंबर 2014 ला सरकार स्थिर ठेवण्यासाठी राजीनामा देण्याची तयारी गोपालदास अग्रवाल यांनी दाखवली होती. तेव्हापासून पाच वर्षे ते मनाने आमच्यासोबत आहेत. पीएससीचे अध्यक्ष म्हणून गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीचे घोटाळे उघड केले आणि पटलावर ठेवले, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात इतकी क्षमता आहे, की ते बाईचा माणूस आणि माणसाची बाई करण्याचा जीआर काढू शकतात. त्यानंतर गोपालदास अग्रवाल यांचा नंबर लागतो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मंचावर उपस्थित असेलेले चंद्रशेखर बावनकुळे आणि गोपालदास अग्रवाल यांचंही कौतुक केलं.