पुणे : शरद पवारांनी (Sharad Pawar) धनगर समाजाच्या भोळेभाबडेपणाचा फायदा घेऊन धनगर समाजाच्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या, अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यशवंत ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी पुण्यातील विधान भवनाबाहेर (Council Hall Pune) ठिय्या मांडला, त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. टीका करताना ते म्हणाले, की रयत शिक्षण संस्थेने वाफगावच्या किल्ल्याचा ताबा सोडावा अन्यथा आम्ही तो किल्ला ताब्यात घेणार. पवार जेजुरीत काही संबंध नसताना पुतळ्याच्या उद्घाटनाला गेले, सांगलीत उद्घाटन केले, तसे या वाफगावच्या किल्ल्याबाबत (Fort) का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आम्ही आता चर्चा करणार नाही. वेळ आली की किल्ला ताब्यात घेणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
वाफगावचा किल्ला ही पुरातन वास्तू आहे. पुरातन वास्तूचे जतन, संवर्धन करणे राज्या सरकारची जबाबदारी असते. एका किल्ल्यासाठी एक आणि दुसऱ्या किल्ल्यासाठी एक अशी भूमिका घेता येणार नाही. गेली अनेक वर्षे हा किल्ला रयत शिक्षण संस्थेकडे आहे. त्यावर एक रुपयाही खर्च केलेला नाही. आता या किल्ल्याची पडझड होत आहे. त्यामुळे तो ताब्यात घ्यावा, अन्यथा लोकवर्गणीतून आम्ही त्याचा विकास करू, असा इशारा त्यांनी दिला.
अहिल्यादेवीच्या नावाने शरद पवारांना राजकारण करायचे आहे. अहिल्यादेवींचा पुतळा जेजुरीत संस्थानच्या वतीने बसवला, तेथे पवार कुटुंबीयांची नावे होती. वास्तविक याच्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे धनगर समाजाच्या भोळेभाबडेपणाचा त्यांनी फायदा घेतला, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.