सांगली : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन राज्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रान उठवलं आहे. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांसोबत गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहे. पडळकर आणि खोत यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. अशावेळी गोपीचंद पडळकर यांचा एका प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पडळकर यांना आता कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. (Court rejects bail pleas of Gopichand Padalkar and Tanaji Patil in Atpadi case)
सांगलीच्या आटपाडी राडा प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्या अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने पडळकर आणि पाटील यांचा अर्ज पेटाळला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
सांगली जिल्हा बँक निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत झालेल्या राड्यामुळे तणावाचे वातावरण आहे. आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी केलाय. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीची तोडफोड केली. त्यानंतर परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आले. त्या प्रकरणात 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा, तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून आटपाडी तालुक्यात छापेमारी करण्यात आली. आमदार पडळकर, तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे राजू जानकर यांची आलीशान चार वाहने जप्त केली. त्यानंतर आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी धाव घेतली. त्यावर आज सुनावणी पार पडली. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी दोघांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकर हे सध्या आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. पडळकर आणि खोत यांच्या नेतृत्वामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. तसंच हा बेमुदत संप एवढ्या दिवस टिकू शकला त्यालाही हे दोघे कारणीभूत असल्याची चर्चा सध्या एसटी कर्मचारी आणि सर्वसामान्य माणसांमध्ये आहे. त्यामुळे अशावेळी पडळकर यांना आझाद मैदानावरून अटक होणार का? असा प्रश्न विचारला जातोय.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांना याबाबत विचारलं असता पोलीस त्यांची कारवाई करु शकतात. मी आझाद मैदानावरच आहे. पोलिसांनी मला बोलावलं तर मी जाईल. महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडायचा होता. मी मुंबईत येत असतानाच अडवणूक करण्यात आली होती. त्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आता कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पोलीस त्यांची कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिलीय.
इतर बातम्या :
Court rejects bail pleas of Gopichand Padalkar and Tanaji Patil in Atpadi case