मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव संभाजीनगर उस्मानाबादचं नाव धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला. मात्र त्यानंतर आलेल्या शिंदे सरकारने ठाकरे यांच्या या निर्णयाला स्थगिती दिली. शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान (Cabinet Meeting) उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत नव्हतं. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय पुढे चालून कायद्याच्या कचाट्यात सापडला असता, असा दावा करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरचं नाव बदलण्याची मागणी पुढे येतेय. ‘हिंदू राजमाता, हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे’, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलीय.
गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. ‘हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुघल, निजामशाहीत हिंदूसंस्कृतीवर हल्ले होत होते, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले. त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक पाट बांधले, बारव बांधले, मंदिरांचं पुनर्निर्माण केलं. यांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला.
हिंदू राजमाता, हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे.
जय अहिल्या, जय मल्हार…@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/a3Ylvwmkex— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 27, 2022
आज जे काही या देशातलं सांस्कृतिक वैभव टिकून आहे त्यात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मोठा वाटा आणि वारसा आहे. त्यांची कर्मभूमी अखंड हिंदुस्थान आहे. परंतु त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची ओळख करून देताना निजामशाही इतिहास डोकावता कामा नये. तर या हिंदुस्थानच्या प्रेरणास्थान हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्वल्यपूर्ण इतिहासाचे स्मरण झाले पाहिजे.
त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे. असे झाल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे असणारा हिंदुस्थानातला पहिला जिल्हा महाराष्ट्रात असेल. ही बाब आपल्या सर्वासाठी अभिमानास्पद असणार आहे. त्यामुळे आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतराचा निर्णय तातडीने घ्यावा ही विनंती, अशी मागणी पडळकर यांनी केलीय.