नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी देशातील नोकरदार वर्गावर (bureaucracy) जोरदार हल्लाबोल केला. सरकार हे नोकरदाराच्या सल्ल्याने काम करणार नाही तर नोकरदारांना मंत्र्यांनुसार काम करावे लागेल असं गडकरी यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. नितीन गडकरी हे नागपुरात (Nagpur) आदिवासी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते म्हणाले की मी नेहमी सरकारी अधिकाऱ्यांना सांगत असतो की, सरकार तुमच्यासाठी नाही तर तुम्ही सरकारसाठी आहात. तुम्हाला फक्त मंत्र्यांच्या आदेशाची आंमलबजावणी करायची आहे. सरकार तुम्ही नाही तर आम्ही मंत्री चालवू, तु्म्ही फक्त आदेशांचे पालन करा. दरम्यान त्यांनी यावेळी महात्मा गांधी यांचे एक उदाहरण देखील दिले. त्यांनी म्हटले की, गरीबांची कामं करताना कोणताही कायदा आडवा येत नाही असे गांधी म्हणत असत. जर कायदा आडवा आला तर तो मोडीत काढताना देखील फार विचार करण्याची आवश्यकता नसते.
दरम्यान त्यापूर्वी मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर नितीन गडकरी यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट करत नव्या मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी महाराष्ट्रातील नव्या मंत्र्यांना शुभेच्छा देतो. तुमचा अनुभव हा राज्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. त्यानंतर ते नागपूरमध्ये आदिवासी विभागाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी नोकरशाहीवर जोरदार टीका केली.
आदिवासी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी नोकरशाहीच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. नोकरदार वर्गाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की, सरकार तुमच्या धोरणानुसार चालणार नाही तर तुम्हाला सरकारच्या धोरणानुसार चालायचे आहे. सरकारमध्ये अंतिम निर्णय त्या- त्या विभागाच्या मंत्र्यांचा असेल. त्या निर्णयाची उत्तमप्रकरे अंमलबजावणी करण्याचे काम हे सरकारी अधिकाऱ्यांनी करावे असे गडकरी यांनी म्हटले आहे.