धुळे : राज्यातील सर्वात चुरशीच्या लढती म्हणजे ग्रामपंचायत निवडणुका. मागील काही दिवसात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये एकाच घरातील दोन व्यक्तीही निवडणुकीच्या मैदानात एकमेकांसमोर उभे राहिल्याचं पाहायला मिळालं. यात प्रचारादरम्यान अगदी नात्यांचीच लढाई सुरु होती. मात्र, आजच्या निकालाने कोण कुणावर भारी पडलंय हे दाखवून दिलंय. ग्रामपंचायतमधील नात्यांच्या लढाईतील सर्वात चुरशीची लढत म्हणजे सासू सुनाची लढत. या निकालात राज्यात अनेक ठिकाणी सासू सुनेवर भारी पडल्याचं दिसतंय. सासांनी सुनांना निवडणुकीच्या रिंगणात चितपट केलंय. धुळ्यातही हेच चित्र पाहायला मिळालंय (Gram Panchayat Election fighting between Mother in law and Daughter in Law who wins?).
धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत्या, परंतु शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे वेगळीच लढत पाहायला मिळाली. दहिवद येथे थेट सासू आणि सून यांच्यात लढत झाली. एकूणच तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांना या निकालाची उत्सुकता होती. आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर या लढतीतील सासूबाई स्मिता चव्हाण यांनी सुनबाई सुनंदा चव्हाण यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
सासू असलेल्या स्मिता चव्हाण यांना दहिवद ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 286 मतं मिळाली. दुसरीकडे त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या त्यांच्या सूनबाई सुनंदा चव्हाण यांना 285 मतं मिळाली. यात अवघ्या एका मताने पराभव पत्करावा लागला.
नांदेडमध्ये सासू-सुनेची फाईट, अवघ्या 4 मतांनी बाजी कुणाची?
नांदेडमध्ये देखील सासू-सुनेची फाईट पाहायला मिळाली. या ग्रामपंचायत निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना पराभवाची धूळ चारली. सासू-सुनेच्या लढाईत सासूबाई रेखा दादजवार यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सासूबाई अवघ्या चार मतांनी वरचढ ठरल्या. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सासू-सून एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या होत्या.
सरपंचपद वाटून घेणारी सासू-सूनेची जोडी
सासू-सुनेचं नातं म्हणजे ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असं म्हटलं जातं. विळा-भोपळ्याप्रमाणे असलेल्या या जोडीने खरंतर गेल्या वेळी सरपंचपद निम्मं-निम्मं वाटून घेतलं होतं, मात्र आता सासूबाईंविरोधात सूनबाई निवडणूक मैदानात उतरल्यामुळे ही ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली होती.
दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रेखा दादजवार आणि संगीता दादजवार या सासू-सूनेची जोडीने राजकीय रिंगणात एकमेकींना टफ फाईट दिली. परंतु या लढाईत सासूच प्रभावी असल्याचं पाहायला मिळालं.
सूनबाईंच्या स्वप्नांनाही सुरुंग
मागच्या टर्ममध्ये या दोघींनी अडीच अडीच वर्ष सरपंच पद भूषवले होते. वीज, पाणी, शाळेसाठी कुंपण अशी अनेक कामं केली, आता पुन्हा संधी मिळाली, तर काम करण्याची इच्छा असल्याचे सूनबाईंनी सांगितलं होतं. मात्र सासूबाईंनी सूनेच्या इराद्यांवर पाणी टाकलं.
सासरे विरुद्ध सूनही मुकाबला
अर्धापुर तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन पॅनल उतरल्याने रंगत आली आहे. विशेष म्हणजे या गावात काका विरोधात पुतण्या आणि सुनेविरोधात सासरा निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आंबेगावची ग्रामपंचायत निवडणूक जिल्ह्यात चर्चेत आली आहे. (Nanded Dabhad Gram Panchayat Mother in law defeats Daughter in law)
पूर्वी या गावावर काँग्रेसचे वर्चस्व होते, मात्र आता काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. तर युवा शक्ती ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून अमोल डोंगरे यांनी सर्व जागेवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आंबेगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
हेही वाचा :
अपराजित योद्धा, वय 73, दहावी पंचवार्षिक, प्रतिस्पर्धी उमेदाराला हरिद्वार यांनी लोळवलं…!
व्हिडीओ पाहा :
Gram Panchayat Election fighting between Mother in law and Daughter in Law who wins?