माढा : लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोग तसेच अनेक समाजसेवी संस्था लोकांना मतदान करण्याचं आवाहन करत असतात. याचीच दखल घेत माढा मतदार संघातील एकाच घरातील दोन भावंडांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आहे. ‘आधी मतदान मग लग्न’, अशी भूमिका या चवरे भावंडांनी घेतली आहे.
माढा शहरातील शिवाजी नगर भागात राहणाऱ्या अभय विलास चवरे आणि अक्षय विलास चवरे या दोघांचे आज लग्न होते. मात्र, ऐन लग्नाच्या दिवशी मतदान असल्याने त्या दोघांनीही लग्नाआधी मतदान करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशी घाईगडबडीत असतानाही अक्षय आणि अभयने घोड्यावरुन मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर ते दोघे लग्नमंडपात पोहोचले.
मतदान हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन प्रशासनातर्फे केलं जातं. त्यानुसार, चवरे बंधूंनी मतदान हे कर्तव्य समजून बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केलं. या दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून लोकांना मतदानाचे महत्त्व समजत आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिक घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदानासाठी वेळ काढा आणि मतदानाची जबाबदारी पार पाडा, असे मत या दोघांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. राज्यातील 14 मतदारसंघात आज मतदान पार पडलं. जळगाव, रावेर , जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या चौदा मतदारसंघामध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं.
पाहा व्हिडीओ :