मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम संपूर्ण देशभर वाजू लागले आहेत. एकिकडे नरेंद्र मोदी तर दुसरीकडे सर्व विरोधक एकत्र येऊन मोदींचा पराभव करण्याच्या तयारीत आहेत. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदींनी ‘चहावाला’ आणि आता 2019 लोकसभा निवडणुकीत ‘चौकीदार’ शब्दावर आपला प्रचार सुरु करत आहे. मोदींनी आतापर्यंत अनेक सभांमधून चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला आहे. शनिवारी (16 मार्च) भाजपने ‘मै भी चौकीदार’ व्हिडीओ लाँच केला आहे. मात्र यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटर अकाऊंटवर आपल्या नावाच्या पुढे चौकीदार शब्द जोडला आहे.
नरेंद्र मोदींनी नाव बदलल्यामुळे सध्या संपूर्ण देशभरातील विरोधकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यंदाच्या निवडणुकीत मोदी चौकीदार शब्दावर आपला प्रचार करणार हे निश्चित झाले आहे. मोदींसह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावाच्या पुढे चौकीदार लिहल्याचे दिसून येत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही ट्विटरवर आपल्या नावापुढे चौकीदार लिहलं आहे.
मोदींनी आपले नाव शनिवारी रात्री ‘मै भी चौकीदार’ व्हिडीओ प्रदर्शित झाल्यानंतर बदलेलं दिसत आहे. मोदींसोबत भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि आयटी सेल प्रमुख अमित मालवीयनेही ट्विटरवर आपल्या नावापुढे चौकीदार जोडलं आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही आपल्या नावापुढे चौकीदार जोडलं आहे.
भाजपच्या ‘मै भी चौकीदार’च्या व्हिडीओवर काँग्रेसने टीका केली आहे. शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह गांधीनी म्हटंलं आहे की, “रक्षात्मक ट्वीट मिस्टर मोदी, आज आपको अराधबोध हो रहा है” याशिवाय गांधीनी शेअर केलेल्या फोटोमध्ये घोटाळे करुन परदेशी पळून जाणारे नीरव मोदी, विजय माल्या, मेहुल चौकसी यांचे फोटो आहेत. तसेच गौतम अदानी आणि अनिल अंबानींचा फोटो सुद्धा यामध्ये दिसत आहे.