गांधीनगर : गुजरात भाजपचे माजी उपाध्यक्ष आणि कच्छ श्रेत्राचे माजी आमदार जयंती भानुशाली यांची धावत्या ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. जयंती भानुशाली हे सयाजी नगरी गाडीने भूज येथून अहमदाबादला जात होते. यावेळी पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी धावत्या गाडीत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत जयंती भानुशाली यांचा जागीच मृत्यू झाला.
जयंती भानुशाली हे भूज येथून अहमदाबादकडे जात होते. ते सयाजी नगरी गाडीच्या एसी डब्यात होते. जेव्हा आज पहाटे ही गाडी मालिया स्थानकाजवळ पोहोचली तेव्हा काही अज्ञात आरोपी गाडीत शिरले आणि त्यांनी भानुशाली यांच्यावर गोळया झाडल्या, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भानुशाली गुजरात भाजपचे माजी उपाध्यक्ष होते, तसेच ते कच्छच्या अबडासा विधानसभा मतदारसंघातून 2007 ते 2012 दरम्यान आमदारही होते.
जयंती भानुशाली यांच्यावर मागीलवर्षी सुरतच्या एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीने फॅशन डिझायनिंगमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने बलात्काराचा आरोप केला होता. तसेच अश्लील व्हिडीओ बनवल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी गुजरात भाजपा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर माझ्यावर लावण्यात आलेला आरोप हा खोटा असून माझं नावं खराब करण्यासाठी हे कारस्थान रचलं गेल्याचं भानुशाली यांनी सांगितलं होतं. माझ्यावर तसेच माझ्या कुटुंबावर करण्यात आलेले आरोप हे तत्थ्यहीन आहेत, असे सांगत त्यांनी बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता.