आयुष्यात 50 कोटी पाहिले नाहीत, जरा बॅग बघू द्या : गुलाबराव पाटील

| Updated on: Nov 08, 2019 | 2:41 PM

कोणी माईचा लाल आम्हाला खरेदी नाही करु शकत.' असं शिवसेना आमदार गुलाबराव पाटील म्हणाले.

आयुष्यात 50 कोटी पाहिले नाहीत, जरा बॅग बघू द्या : गुलाबराव पाटील
Follow us on

मुंबई : ‘आम्ही 50 कोटीला भीक घालणारे लोक नाही आहोत. कोणी माईचा लाल आम्हाला खरेदी नाही करु शकत.’ अशा शब्दात शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी (Gulabrao Patil on BJP Offer) 50 कोटींच्या ऑफरचा दावा फेटाळून लावला. भाजपने फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली असून शिवसेना आमदाराला 50 कोटींची ऑफर दिल्याचा दावा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

‘कुठे आहे 50 कोटीची बॅग जरा बघू तर द्या, अजूनपर्यंत आयुष्यात काय 50 कोटी पाहिलेले नाहीत. आम्ही 50 कोटीला भीक घालणारे लोक नाही आहोत. त्यामुळे या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत. इथे सगळे जण आरामात फिरत आहोत. कोणी माईचा लाल आम्हाला खरेदी नाही करु शकत.’ असं गुलाबराव पाटील ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाले. ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातून आमदार आहेत.

शिवसेनेच्या आमदारांना रंगशारदाला लपवलेलं नाही. सगळ्या जणांना एकत्र थांबायला सांगितलं आहे. कधी काय निर्णय होईल, सांगता येत नाही. कोणी पाचशे किलोमीटरवर राहतं, तर कोणी सातशे किलोमीटरवर. त्यामुळे ऐन वेळी वाहनाची अडचण निर्माण होऊन तारांबळ उडू नये, यासाठी ही सोय असल्याचं गुलाबराव म्हणाले.

भाजपने फोडाफोडीसाठी फोन केलेल्या आमदाराचं नाव वडेट्टीवारांनी फोडलं

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सेनाभवनात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ते ‘रंगशारदा’ला गेल्यानंतर शिवसेना आमदारांना दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. आमदारांच्या निवासाची सोय होत नसल्यामुळे सर्वांना इतरत्र हलवण्यात (Gulabrao Patil on BJP Offer) येत आहे.

50-50 मुख्यमंत्रिपद हा हट्ट नाही तर हक्क आहे. भाजपने शब्द दिल्याचं सगळ्यांनी पाहिलं आहे. अडीच वर्षाची कमिटमेंट त्यांनी पाळावी आणि सत्ता स्थापन करावी. पुढची भूमिका जी ‘मातोश्री’ची असेल, ती आमची असेल, असंही गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलं.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?

नाशिकमधील इगतपुरी मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार हिरामण खोसकर यांना भाजपने ऑफर दिल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

शिवसेना आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर : वडेट्टीवार

काही आमदारांशी संपर्क करुन प्रलोभन द्यायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटी रुपयांची खुली ऑफर दिल्याचं मी टीव्ही चॅनलवर पाहिलं. त्यानंतर आमच्या आमदारांनाही संपर्क करण्यात आला, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

अशाप्रकारे मित्रपक्षाच्या आमदारावरच त्यांचा डोळा आहे. याचा अर्थ ते काहीही करु शकतात. त्यांनी आमच्या आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट 100 टक्के खरी आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं होतं.

हा सत्तेचा घोडेबाजार उघड झाला पाहिजे म्हणून मी आमदारांना सांगितलं फोन टॅप करा. हे पुरावे जनतेसमोर दाखवायचे आहेत, असंही वडेट्टीवार म्हणाले होते.