नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) नंदुरबारमध्ये होते. त्यांनी नव्या नगरपरिषद इमारतीचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांच्यासोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या शायराना अंदाजात एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं तर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
जबसे तुम्हारी निगाहे मेहरबान हो गयी,
मुश्कीलें तो बहुत थी, जिंदगी आसान हो गयीं
बेहद करीब होनें का हमें एक फायदा हो गया
के मतलब परस लोगों की हमें पहचान हो गयी
या शायरीच्या आधारे त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. तर ठाकरेंवर निशाणा साधलाय.
आमच्यावर आरोप केले जात आहेत. शिवसेना आम्ही मोठी केली. आयुष्यातील 35 वर्षे शिवसेनेसाठी खर्च केली. खेड्यापाड्यात शिवसेना पोहोचवली. धुळे नंदुरबारच्या खेड्यापाड्यात शाखा विस्तारणारा, शाखांचं उद्घाटवन करणारा हा गुलाबराव पाटील आहे आणि माझ्यावर आरोप केले जात आहेत. तुम्ही आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना पक्षाच्या नावाचा अर्थही सांगितलाय. शि म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही, ती मर्दांची संघटना म्हणजे गुलाबराव पाटील आहे, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
खेड्यापाड्यात जाऊन आम्ही शिवसेना वाढवली. पण मुंबईचे लोक म्हणतात आम्ही सेनेशी गद्दारी केली. त्यांना मी सांगतो की शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही. तर शिवेसेना वाचवण्यासाठी आम्ही हे काम केलंय. 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले आम्ही माजलेले बोके…, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.