जळगाव : शिवसेनेचे नेते आणि पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपच्या जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात जोरदार वाक् युद्ध रंगल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याच्या निर्णयावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन द्यायला हवे, असा खोचक टोला रक्षा खडसे यांनी लगावला आहे. त्यावर आता लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवावी, असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी दिलंय. (Gulabrao Patil responds to MP Raksha Khadse’s criticism)
केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन द्यायला हवे, असा खोचक टोला भाजप खासदार रक्षा खडसे यांना लगावला होता. त्याला आता गुलाबराव पाटलांनीही उत्तर दिलंय. लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवली पाहिजे. लेक आहे तर लेक आहेच. लेकीने बापाच्या कामाचा विचार करावा आणि लेकीने बापाच्या हद्दीत राहावं, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.
हवामानावर आधारित फळपीक विम्याचे निकष राज्य शासनाने बदलले. पण भाजप खासदार रक्षा खडसे या केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करीत आहेत. कुठे लग्न दिसले की आपला बाजा घेऊन त्या ठिकाणी वाजविण्यास त्या हजर होतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यानंतर रक्षा खडसे यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला होता.
केळी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात श्रेय घेण्यावरुन वाद सुरु झाला आहे. याच वादातून राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या :
Gulabrao Patil responds to MP Raksha Khadse’s criticism