मुंबई : दसरा मेळाव्याआधीच(Shivsena Dasara Melava 2022)राजकारण तापले आहे. ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसे मैदानावर होणार आहे. एकाच दिवशी दोन्ही गटाचे मेळावे होणार असल्याने आता गर्दी जमवण्यासाठी दोघांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे( Uddhav Thackeray) यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील( Gulabrao Patil ) यांनी यावरुन उद्धव ठाकरे यांना टोमणा लगवाला आहे.
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे, यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असं होत नाही, तीन तासाची सभा त्यात कोणती लढाई? असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
शिवतीर्थावर शिवसेनेची सभा होत आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. सभा झालीच पाहिजे. पण या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका असा टोमणा गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना मारला आहे.
आम्ही देखील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितल आहे. दसरा मेळाव्यासाठी कुणाकडे जास्त लोकं येतात या त्याच दिवशी कळेल असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंपेक्षा जास्त गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाचे जबरदस्त प्लानिंग सुरु केले आहे. दसरा मेळाव्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून चार हजार लोक आणण्याचे टार्गेट युवा सेनेला दिले आहे.
कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच आक्रमक होते. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता.
हे प्रकरण कोर्टात गेले. यानंतर कोर्टाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. तर, शिंदे गटाने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.