मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार राडा घातला होता. अचानकपणे झालेल्या या राड्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या सांगण्यावरुनही एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला. या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते आणि एसटीच्या 115 कर्मचाऱ्यांना (ST Workers) मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. सध्या हे सर्व एसटी कर्मचारी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात गुणरत्न सदावर्ते हे मुख्य आरोपी तर एसटी कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आलं होतं.
पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणात सदावर्ते यांच्यासह 115 एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केलाय. मात्र, याची डिटेल ऑर्डर येण्यासाठी संध्याकाळ होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ती जेल प्रशासनाकडे जाईल. त्यामुळे उद्या या सर्व आरोपींची सुटका होऊ शकते. मात्र, उद्या जर त्यांची सुटका झाली नाही तर परवा रविवार आहे. त्यामुळे सर्वांची सुटका होण्यासाठी सोमवारही उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
सध्या वकील गुणरत्न सदावर्ते हे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. काल त्यांना कोल्हापूर कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि फिर्यादींच्या वतीनं वकील शिवाजीराव राणे यांनी कोर्टात बाजू मांडली. तर सदावर्ते यांच्या बाजूनं पीटर बारदेस्कर यांनी युक्तिवाद केला. कोल्हापूर पोलिसांकडे सदावर्तेंचा ताबा येण्याआधी त्यांना सातारा पोलिसांच्या हवाली करण्यात आलं होतं. मात्र सातारा जिल्हा सत्र न्यायालयानं बुधवारी गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा दिला होता. गिरगाव कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांना देण्यात आला होता.
कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस स्थानकात गुणरत्न सदावर्तेंविरोधात तक्रार देण्यात आली होती. मराठा समाज समन्वय समितीचे दिपील मधुकर पाटील यांनी ही तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोल्हापुरामध्ये कलम 153 अ नुसार गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि एकोप्याला बाधा येईल, अशी कृती केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच सदावर्ते यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर आता याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
इतर बातम्या :