ठाणे : हजारो एसटी कर्मचाऱ्यांचे मसिहा बनलेले, त्यांच्या न्यायहक्कांसाठी न्यायालयात लढा देणारे, प्रसंगी पवारांसह अख्ख्या सरकारशी वैर घेणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) सध्या पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीत ‘फिरत’ आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणारे हे गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayashree Patil) आपल्या सोसायटीत किंबहुना आपल्याच लोकांमध्ये बदनाम आहेत! सदावर्ते यांची गुंडगिरीची भाषा आणि त्याच प्रकारची वर्तणूक यामुळे ते राहत असलेल्या क्रिस्टल टॉवर सोसायटीतील (Crystal Tower Society) रहिवासी चांगलेच वैतागले आहेत. सदावर्ते यांनी रहिवासी इमारतीतच आपल्या वकिलीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांमुळे सोसायटीतील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. इतकंच नाही तर तक्रार करण्यासाठी गेल्यावर सदावर्ते यांच्याकडून शिवीगाळ, तसंच थेट कोर्टात खेचण्याची धमकी मिळत असल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय.
एकीकडे सदावर्तेंवर गुन्ह्यांमागे गुन्हे दाखल होत आहेत. दुसरीकडे त्यांच्या पत्नी जयश्री पाटलांवरही कटात सहभागी आणि एसटी कर्मचाऱ्यांकडून 80 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यात आता सदावर्ते मुंबईत ज्या क्रिस्टल टॉवरमध्ये राहतात तिथल्या रहिवाशांकडून सदावर्तेंविरोधात तक्रारींचा पाढा वाचला जातोय. सदावर्तेंच्या इमारतीत राहत असलेल्या एका महिलेनं जयश्री पाटलांवर अरेरावी आणि मारहाणीचा आरोप केलाय. संबंधित महिला ही डॉक्टर आहे. तिने सांगितल्याप्रमाणे, जयश्री पाटील यांनी तिला व तिच्या वयोवृद्ध आईलाही मारहाण केली. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलं असता 24 तासांच्या आत तुम्हालाच आर्थर रोड कारागृहात टाकू अशी धमकी सदावर्ते यांनी केली. तसंच ते सोसायटीचा मेटेनन्सही भरत नसल्याचा दावा या महिलेनं केलाय.
दुसऱ्या एका रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार सोसायटीमध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याला सदावर्ते यांनी शिवीगाळ केली नाही किंवा त्यांच्याशी भांडण झालं नाही. प्रत्येक वेळी कोर्टात खेचण्याची भाषा केली जात. मान्य तुम्ही वकील आहात, पण मग त्याचा गैरफायदा घेणार का? बरं कोर्टात खेचून करणार काय? असा सवाल या रहिवाशाने विचारलाय. सोसायटीच्या सेक्रेटरी महिला आहेत. त्यांनीही महिनाभरापूर्वी त्यांच्या घरी जाऊन जयश्री पाटील यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदावर्ते कुटुंबाची समजून घेण्याची तयारीच नसल्याचं त्यांनी सांगितलं.
सदावर्ते हे परळ इथल्या या क्रिस्टल टॉवरच्या 16 व्या मजल्यावर राहतात. 2015 साली सदावर्तेंनी 2 बीएचकेचा फ्लॅट इथं खरेदी केला.
ज्याची किंमत अंदाजे 1 कोटी 25 लाख आहे. सदावर्तेंकडे मालकीच्या 4 गाड्या आहेत. मात्र त्या चारही गाड्यांना पार्किंगची परवानगी
नसतानाही गाड्या पार्क केल्यामुळेही अनेकदा वाद झाले आहेत. रहिवाश्यांच्या आरोपांनुसार सदावर्तेंनी स्वतःच्या घरात अनधिकृत
बांधकाम केलंय, ज्याची तक्रार नगरविकास विभागाकडे देऊनही कारवाई झालेली नाही, असा दावाही सोसायटीमधील रहिवाशांनी केलाय.
इतर बातम्या :