मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून बॅनरच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री (Matoshree) बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरवर युवानेते तेजस साहेब ठाकरे यांना वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा असा मजकुर छापण्यात आला आहे. शिवसेनेमध्ये सध्या मोठे बंड सुरू आहे. अनेक महत्त्वाचे नेते शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटात सामील झाले. अशा स्थितीमध्ये आता सेनेला सावरण्याची जबाबदारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर आहे. युवानेते आदित्य ठाकरे देखील राज्यभरात शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनीकांशी संवाद साधत आहे. आता तेजस ठाकरे हे देखील सक्रिय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. शिवसेनेमधील सध्याची परिस्थिती पहाता युवा सेनेची जबाबदारी ही तेजस ठाकरे यांच्यावर येऊ शकते.
शिवसेनेची सध्याची परिस्थिती पहाता तसेच निर्माण झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर लवकरच उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या खांद्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. तसे संकेत मातोश्रीकडून देखील मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसैनिकांनी देखील तयारी सुरू केली असून, तेजस यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री परिसरात अनेक भव्य असे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर युवानेते तेजस साहेब ठाकरे यांना वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा असा मजकुर छापण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच तेजस ठाकरे यांना शिवसेनेत एखादे मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आली आणि शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेतील अनेक महत्त्वाचे नेते हे शिंदे गटात सामील झाल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे. आता ही पोकळी भरून काढण्याचे काम आदित्य ठाकरे करताना दिसून येत आहे. ते शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनीकांशी संवाद साधत आहेत. तसेच त्यांनी या बंडानंतर मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी शिवसैनिकांचे मेळावे घेतल्याचे पहायला मिळाले. आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांचे बंधू तेजस ठाकरे देखील राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.