गांधीनगर : लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला पाटीदार नेता हार्दिक पटेलला गुजरात हायकोर्टाने दणका दिलाय. हायकोर्टाने हार्दिक पटेलला निर्दोष मुक्त करण्याची याचिका फेटाळली आहे. यामुळे त्याला निवडणूक लढता येणार नाही. अमरेली किंवा जामनगर मतदारसंघातून हार्दिक पटेल निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती.
हार्दिक पटेलवर 2015 मध्ये मेहसाणा दंगली प्रकरणी खटला सुरु आहे. कनिष्ठ न्यायालयाकडून हार्दिक पटेलला शिक्षाही सुनावण्यात आली होती. या निर्णयाविरोधात हार्दिक पटेलने हायकोर्टात आव्हान दिलं होतं, ज्यावर सुनावणीस नकार देत कोर्टाने निर्दोष मुक्त करण्याची मागणी फेटाळली. कोर्टाच्या या निर्णयामुळे लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार हार्दिक पटेलला निवडणूक लढता येणार नाही.
हार्दिक पटेलची याचिका फेटाळण्यापूर्वी त्याच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांनाही विचारात घेण्यात आलं. त्याच्यावर काही गंभीर गुन्ह्यांसह एकूण 17 एफआयआर दाखल आहेत. कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर हार्दिक पटेलला हायकोर्टाने जामीन दिला होता. हार्दिक पटेलचा काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्येही समावेश आहे.