पुणे : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Indapur Harshvardhan Patil) 7 सप्टेंबरला भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. कारण, त्यांनी याबाबत कुटुंबाशी चर्चा केली असून बुधवारी कार्यकर्ता मेळावा बोलावलाय. या मेळाव्यातच हर्षवर्धन पाटील (Indapur Harshvardhan Patil) भाजप प्रवेशाची घोषणा करु शकतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सोडल्याची माहिती आहे. या जागेवरुनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर वाद आहे.
विशेष म्हणजे 7 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. औरंगाबादेत मोदींचा कार्यक्रम होणार आहे. मोदींच्या उपस्थितीत कुणाचाही प्रवेश होणार नाही, असं अगोदरच स्पष्ट करण्यात आलंय. पण 7 सप्टेंबरलाच हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागा वाटपात पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघ काँग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येतंय. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंरदर, भोर आणि जुन्नर हे मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आले आहेत, तर इंदापूरची जागा राष्ट्रवादीने स्वत:कडे ठेवली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजपात जाण्याची शक्यता आहे
काय आहे इंदापूरच्या जागेचा वाद?
2014 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत इंदापूरची जागा काँग्रेसकडे होती. मात्र त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यात इंदापूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांचा विजय झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी अनेकदा काहीही झालं तरी राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती.
त्यामुळं लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीच्या उमेदवाराचं काम न करण्याचा पवित्रा घेतला. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासह जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन समेट घडवला. त्यामुळं इंदापूरमध्ये अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांनी एकत्रित सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन आमच्यात सर्व काही अलबेल असल्याचं दाखवलं.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी किंवा आघाडीकडून इंदापूरच्या जागेबाबत निर्णय जाहीर होईल अशी शक्यता होती. मात्र तसं काहीच घडत नसल्यानं अखेर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याचा आग्रह केला.