हातकणंगले लोकसभा मतदारसंघ : दोनदा खासदार राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. 5 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या माने घराण्यातील धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढत शेट्टींचा पराभव केला. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. एक कोल्हापूर आणि दुसरा हातकणंगले. हातकणंगले मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. या लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेमध्ये 70.28 टक्के इतकं मतदान झालं होतं. मात्र 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2 टक्के मतदान कमी झाले होते. 2014 मध्ये याठिकाणी 72.09 टक्के इतकं मतदान झालं होतं.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | धैर्यशील माने (शिवसेना) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | राजू शेट्टी (स्वाभिमानी) | पराभूत |
अपक्ष/इतर | अस्लम बादशाहजी सय्यद (VBA) | पराभूत |
हातकणंगले लोकसभा अंतिम निकाल
या लढतीला महत्व का आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीकास्त्र सोडून राष्ट्रीय पातळीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख मिळवली. त्यामुळं त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपनं सर्व ताकद माने यांच्या पाठिशी उभा केली होती. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली. त्याचा फटका थेट सरकारलादेखील बसला. त्याविरोधात धैर्यशील माने हे शेतकरी, तरुण, व्यापारी आणि उद्योजक यांचे मुद्दे घेऊन या रिंगणात उतरले. त्यामुळं एक मुरब्बी राजकारणी विरुद्ध तरुण तडफदार उमेदवार असं चित्र याठिकाणी पाहायला मिळालं. विशेष म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळं उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली.
मतदानाची आकडेवारी पाहिली तर 2014 साली या मतदारसंघात 72.09 टक्के इतकं मतदान झालं होतं, तर यावेळी 70.28 टक्के मतदान झालं.
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी
मतदारसंघ २०१४ २०१९
शाहूवाडी ६९.६२ टक्के ६६.७५ टक्के
हातकणंगले ७५.१३टक्के ७५.९४ टक्के
इचलकरंजी ७२.५९ टक्के ६८.१६ टक्के
शिरोळ ७६.३२ टक्के ७३.२९ टक्के
इस्लामपूर ७२.५३ टक्के ६९.१३ टक्के
शिराळा ७१.६१ टक्के ६७.५२ टक्के
एकूण टक्केवारी पाहता २०१४ च्या तुलनेत सुमारे २ टक्का घट झाली. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात १७ लाख ७२ हजार ५६३ मतदार आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा दीड लाख मतदार जास्त होते. यापैकी ६ लाख १३ हजार ०४३ पुरुषांनी मतदान केलं. तर ५ लाख ४३ हजार १५९ महिलांनी मतदान केलं. तर इतर १६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सगळ्यात कमी मतदान शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात झाल्याचं पाहायला मिळालं.
यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्ये, कुणा-कुणाच्या सभा झाल्या?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं यंदाच्या लोकसभेचं वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या.दोन्ही बाजूनं याठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करुन प्रचार केला. या मतदारसंघात सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांचा संघर्ष पाहायला मिळाला. आघाडी आणि युतीच्या सभा तर याठिकाणी झाल्या.त्याचबरोबर राज ठाकरे यांनी इचलकरंजीमध्ये मनसेची जाहीर सभा घेतली. यासभेमधून राज ठाकरे यांनी थेट मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं.