मुंबई – राज ठाकरेंनी (Raj thackeray) महाराष्ट्रातल्या भोंग्याबाबत भूमिका घेतल्यापासून मनसेचे (MNS) आक्रमक झाले आहेत. ही भूमिका त्यांनी ठाणे आणि औरंगाबाद मधील सभेत सुध्दा ठाम असल्याचे सांगितले. त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केला. तर अनेक नेत्यांनी टीका देखील केली. राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. त्यातच राज ठाकरे यांच्या घरी बैठक आटोपल्यानंतर संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आपल्या गाडीतून पळ काढल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. तसेच ज्यावेळी संदीप देशपांडे यांची तिथून गाडी गेल्यानंतर त्यावेळी एक पोलिस महिला कर्मचारी जमीनीवर कोसळली. देशपांडे यांनी पोलिसांना गुंगारा दिल्याने त्यांच्यावरती शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज संदीप देशपांडे यांना कोर्टात दिलासा मिळणार का ?
आज सुनावणी होणार आहे
राज ठाकरेंच्या घरासमोर पोलिस महिला कोसळल्यानंतर संदीप देशपांडे यांच्यावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. तसेच महिला कोसळत असल्याचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला होता. त्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून मुंबई पोलिस संदीप देशपांडे यांचा शोध घेत आहेत. संदीप देशपांडे यांनी जामीनासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यांना आज जामीन मिळणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अयोध्येत पोस्टरबाजी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याने महाराष्ट्राचे राजकारण अयोध्येपर्यंत खेचले आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे 10 जून रोजी राम मंदिरात पूजेसाठी येत आहेत. या दोघांच्या भेटीबाबत अयोध्येच्या रस्त्यांवर होर्डिंग आणि पोस्टर युद्ध सुरू झाले आहे. रविवारी शिवसेना समर्थकांनी अयोध्येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खरे वारसदार असल्याचे पोस्टर लावले होते.