हिंगोलीः मुख्यमंत्री (CM Eknath Shinde ) साहेब, आम्ही महाराष्ट्रात राहतो का बिहारमध्ये? असा सवाल एका शेतकऱ्याने केला आहे. तेसुद्धा मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र (Letter) लिहून.. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनं एकनाथ शिंदेंच्या नावे पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. तालुक्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे ओढे, नाले फुटल्याने शेतात पाणी शिरलं. पिकांचं मोठं नुकसान झालंय. नव्या सरकारर्फे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा लागली होती. मात्र सेनगाव तालुक्यातील काही ठिकाणच्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.
सेनगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे झाले. तालुका प्रशासनाने 32 कोटी 23 लाख 47 हजार 200 रुपये एवढा निधी अतिवृष्टीधारकांमध्ये वितरीत होणार असं म्हटलं. मात्र सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, आजेगाव, बाभूळगाव आणि पुसेगाव हे चार मंडळं अतिवृष्टीतून वगळण्यात आली. त्यामुळे येथील शेतकरी निराश झालेत.
अशाच एका नाराज शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहिलं. वरील चार मंडळाचा समावेश करून अतिवृष्टी नुकसान भरपाईची मागणी तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब,
विषय:-आम्ही महाराष्ट्रात राहतो का.. बिहारमध्ये…? अतिवृष्टीतून वगळ्याल्या प्रकरणी…
सेनगाव तालुक्यात पेरण्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक शेतकरी देशोधडीला लागले. सगळे राजकारणात गुंतले होते. सोबत कृषी विभागालाही विसर पडला..
सेनगाव तालुक्यातील शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना आपण अनेक मंडळे नाकारली. तालुक्यात सर्व दूर पाऊस असताना आपण तीन मंडळे अतिवृष्टीतून नाकारली. मग आम्ही महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये राहतो का.?
साहेब, अधिवेशनात घोषणा केली.. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.. मग हे काय खाजगी कंपनीने नाकी नऊ आणले? जगायचे कसे ते सांगा..
अन्यथा अंगात राहिलेल्या बाकी रक्ताने अभिषेक करून आम्ही आमचे जीव सोडून देऊ.. अनुदान द्या..
अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या या चार मंडळांतील शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची अपेक्षा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या आदेशाकडे लागल्यात.