मुंबईः गोरगरीब जनतेवर अन्याय होत असेल, भ्रष्टाचार होत असेल तिथे मी कायदा हातात घेणार. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल जाले तरी चालतील, त्याची पर्वा नाही, असं वक्तव्य हिंगोलीचे (Hingoli) आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी केलंय. हिंगोलीत कामगारांना असलेल्या मध्यान्ह भोजनाचा दर्जा निकृष्ठ असल्याचा आरोप करत संतोष बांगर यांनी उपहार गृहाच्या व्यवस्थापकाच्या (Manager) कानशीलात वाजवल्याचा प्रकार काल घडला. या घटनेची व्हिडिओ क्लिप तुफ्फान व्हायरल झाली. त्यानंतर संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडात ऐनवेळी शामिल झालेले संतोष बांगर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. आता हिंगोलीतील व्यवस्थापकाला कानशीलात लगावल्यामुळे त्यांच्याविरोधात जोरदार टीका होतेय. यावरून प्रतिक्रिया विचारली असता बांगर यांनी गरीब जनतेच्या हितासाठीच मी हे केल्याचं वक्तव्य केलंय.
काल घडलेल्या घटनेचं समर्थन करताना संतोष बांगर म्हणाले, ‘ खराब झालेले दाळी, हरभरे, कांदे माध्यमांना दाखवली. मला सहन झालं नाही. माझ्या गरीबांवर अन्याय होत असेल तर मी कायदा हातात घेतल्याशिवाय राहाणार नाही. ज्या गरीबांनी मला निवडून दिलं त्यांना न्याय देण्याचं काम मी करत राहीन. हिंगोलीतच नाही तर महाराष्ट्रात हीच स्थिती आहे. मला फोन येतायत.48 हजार डबे हिंगोली जिल्ह्यात दाखवले आहेत. लोकसंख्याच इथे 75 हजार आहे. कामगार 48 हजार दाखवले आहेत. इथे भ्रष्टाचार आहे. याविरोधात मी आवाज उठवणार आहे. विधानसभेत हे प्रश्न मी उचलणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. संबंधित काँट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
माझ्यावर गुन्हा दाखल होण्याची मला भीती नाही. गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक गुन्हे दाखल झाले तरी मला पर्वा नाही, असे संतोष बांगर म्हणाले.
विविध जिल्ह्यांतील कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेद्वारे खासगी कंत्राटदारांमार्फत डबे पुरवले जातात. मात्र हिंगोलीत कंत्राटदारांकडून योग्य दर्जाचे जेवण दिले जात नसल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला. त्यांनी स्वतः हिंगोलीतील गावांत जाऊन टेम्पोने पाहणी केली असता या जेवणात अळ्या आणि माशा पडलेल्या दिसून आल्या. संबंधित उपहारगृहाच्या व्यवस्थापकाने ही चूक पुन्हा होणार नाही, असे म्हणताच बांगर यांनी त्याच्या कानशीलात लगावली. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी आमदार बांगर यांनी केली आहे. लिंबाळा येथील मध्यान्ह भोजनाच्या किचनची आमदार बांगर यांनी तपासणी केली असता तेथे त्यांना सर्व भाजीपाला सडलेल्या अवस्थेत दिसून आला. शासनाने आखून दिलेल्या नियमांनुसार, येथून डबे पुरवले जात नसल्याचे आढळून आल्याचे बांगर यांनी म्हटले आहे.